Sat, Sep 26, 2020 23:35होमपेज › Kolhapur › सोन्याला ‘35 हजारी कस’ लागण्याची चिन्हे! 

सोन्याला ‘35 हजारी कस’ लागण्याची चिन्हे! 

Published On: Apr 25 2019 1:44AM | Last Updated: Apr 25 2019 1:07AM
कोल्हापूर : सुनील कदम

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कारणांमुळे  गेल्या काही दिवसांत सोन्याच्या खरेदीला तुफानी वेग आला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1286 डॉलरवर असलेले प्रतिऔंस सोन्याचे दर 1425 डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील सोन्याचे दर येत्या काही महिन्यांमध्ये प्रतितोळा 35 हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकन डॉलरची सर्वाधिक चलती आहे. त्या तुलनेत रशियन ‘रुबल’ आणि चिनी ‘युआन’ यांना फारसे स्थान नाही. त्यामुळे अमेरिकेची मक्‍तेदारी मोडीत काढण्यासाठी रशिया आणि चीनने स्वत:ची सांपत्तिक आधार असलेली क्रिप्टोकरन्सी जागतिक बाजारपेठेत स्थापित करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून रशिया आणि चीनने आंतराष्ट्रीय बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे खरेदी करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून रशियाकडे 2149 टन आणि चीनकडे 1185 टन सोन्याचे राखीव साठे निर्माण झाले आहेत. त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हे आकडे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या दोन देशांकडे त्यापेक्षा कित्येक पट अधिक सोन्याचे राखीव साठे निर्माण झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय जगभरातील इतरही काही देश वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे खरेदी करीत आहेत. ही खरेदी जवळपास 1 हजार टनाच्या आसपास आहे. या कारणांनी गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याला चांगलीच बरकत येताना दिसत आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रतिऔंस 1286 डॉलर इतके आहेत. येत्या काही महिन्यांत ते प्रतिऔंस 1425 डॉलरवर पोहोचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. (1 औंस म्हणजे 28.35 ग्रॅम, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आणि 1 डॉलर म्हणजे 69.66 रुपये). आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रतिऔंस 1286 डॉलर (89 हजार 582 रुपये = प्रतिग्रॅम जवळपास 3159 रुपये) आहेत.  या दराच्या तुलनेत आज देशातील सोन्याचे दरही साधारणत: तेवढेच म्हणजे प्रतिग्रॅम 3160 रुपयांच्या आसपास आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याचे दर 1425 डॉलरवर गेल्यास देशातील सोन्याचे भावही प्रतिग्रॅम 3501 रुपयांपर्यंत वाढल्याशिवाय राहणार नाहीत. याचा अर्थ येत्या काही दिवसांमध्ये देशातील सोन्याचे दर प्रतितोळा 35 हजारावर जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.