Fri, Oct 30, 2020 08:07होमपेज › Kolhapur › वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणणारे त्यांचेच गुलाम

वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणणारे त्यांचेच गुलाम

Published On: Sep 19 2019 1:30AM | Last Updated: Sep 19 2019 1:13AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणणारे आज भाजपचे गुलाम झाले आहेत. अशा लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला. विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’साठी आमची चर्चेची दारे खुली आहेत; पण त्यांनी त्यांच्याकडूनच ती बंद केली आहेत, असा दावाही त्यांनी केला. सत्ता संपादन रॅलीच्या सांगता समारंभानिमित्त कोल्हापुरात आलेले अ‍ॅड. आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभेवेळी ज्या जागेवर तुम्ही हरणार आहात, त्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्या, अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे केली होती, असे सांगून अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आम्ही अशी मागणी केली म्हणून आम्ही भाजपची ‘बी टीम’ झालो, असा कोणी आरोप करीत असेल, तर अशा डोक्यांना माझा सलाम आहे. मात्र, जे स्वत: भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करतात, तेच आमच्यामागे आघाडी करा म्हणून लागले आहेत. आम्ही ए किंवा बी टीम आहोत, हे सांगण्यापेक्षा आम्ही भाजपचे गुलाम आहोत हे त्यांनी सांगावे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससमोर निम्म्या-निम्म्या जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेसवालेच भाजपच्या इशार्‍यावर चालतात. आम्ही वंचित आघाडीला चर्चेत अडकवून ठेवतो. या बदल्यात आमच्या चौकशा थांबवा, असे काँग्रेस नेते भाजप नेत्यांना सांगत असल्याचे निदर्शनास येताच आम्ही काँग्रेसबरोबर टोकाची भूमिका घेतली आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्टकेले.

भटका विमुक्‍त समूह आजही आमच्याबरोबर आहे. लक्ष्मण माने यांनी आजवर अनेक कोलांट्या उड्या मारल्या आहेत. काँग्रेसबरोबर जाण्याचा त्यांचा आग्रह होता. चर्चेचे अधिकार हे माने यांनाच दिले होते. मात्र, त्यात यश आले नाही, असे सांगून अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आज एमआयएम आमच्याबरोबर नसला तरी मुस्लिम समाज कोणाच्या दावणीला बांधलेला नाही. तो आजही आमच्याबरोबर आहे.

ते म्हणाले, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंचित आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित मतदारसंघांतील उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. राज्यातील अन्य पक्षांतील अनेक नाराज व बिगर नाराज असे दोन्ही प्रकारचे नेते आपल्या संपर्कात आहेत.

आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी करण्याचा प्रकार

भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. अशा स्थितीत सेनेतून आदित्य ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा करणे म्हणजे सेनेत राहुल गांधी तयार करण्यासारखे आहे, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री भविष्यकार आहेत. त्यांना आघाडीची भीती वाटत असल्याचेच यातून सूचित होत आहे. वंचित आघाडीची झेप सत्ता संपादनासाठीची आहे. ती झेप आम्ही घेणारच.

ईव्हीएम हॅक होऊ शकतात

ईव्हीएम हॅक होऊ शकतात, हे आम्ही कोर्टात सिद्ध करू शकतो. मात्र, मतदान प्रक्रियेत ही मशिन ज्या इलेक्शन ऑफिसरच्या ताब्यात असतात, त्यांनी कोर्टात हजर राहणे गरजेचे आहे. मतदान किती झाले व प्रत्यक्ष जाहीर किती झाले यावर चर्चा झाली तरच ईव्हीएम घोटाळा बाहेर पडणार आहे. यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, अनिल म्हमाने, हाजी अस्लम सय्यद, डॉ. प्रेमकुमार माने, सतीश माळगे, दयानंद ठाणेकर, दत्ता मिसाळ, कपिल राजहंस आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमचे दामन किती साफ आहे बघा...

शरद पवार यांनी बहुजन वंचित आघाडीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होते, असे मत व्यक्‍त केल्याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले, टीका करत असताना आपले दामन किती साफ आहे, हे त्यांनी आधी बघावे. आपण बेदाग असेल तरच तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे.