Sun, Jul 05, 2020 16:11होमपेज › Kolhapur › ‘भ्रष्टाचार’ नावाच्या संघटनांचेच आता निर्मूलन!

‘भ्रष्टाचार’ नावाच्या संघटनांचेच आता निर्मूलन!

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:28AMकोल्हापूर : विकास कांबळे

भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानवाधिकार असे शब्द वापरून पावलोपावली निघालेल्या संघटना आता बंद होणार आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन आणि मानवाधिकार हे दोन शब्द संघटना किंवा संस्थेच्या नावासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या संघटनांच्या नावामध्ये वरील दोन शब्द आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसे पत्र राज्याचे धर्मादाय आयुक्तांनी सर्व जिल्ह्यातील धर्मादाय सहआयुक्त, उपआयुक्त यांना पाठविले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार निर्मूलन नावाने संघटना काढली. या संघटनेचे त्यांनी राज्यभर जाळे विनले. शासन दरबारी आण्णा हजारे यांचे वजन असल्यामुळे या संघटनांच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनीही शासन दरबारी आपली ओळख वाढविण्यास सुरुवात केली. भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचा दबदबा प्रत्येक जिल्ह्यात वाढला होता. नंतरच्या काळात मात्र जिल्हा पातळीवरील पदाधिकारी या संघटनेच्या नावाचा गैरवापर करू लागले. त्याच्या तक्रारी हजारे यांच्याकडे गेल्यानंतर काही जिल्ह्यांतील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना संघटनेतून बाहेर काढले. बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन शब्द वापरून नवीन संघटना काढण्यास सुरुवात केली.  महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये अशा संघटनांचे पेव फुटू लागले. भ्रष्टाचार निर्मूलनाबरोबरच मानवधिकार हा एक शब्द वापरून काही जणांनी संघटना काढल्या. शासनाने आता हे नाव वापरण्यास बंंदी घातली आहे.

भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम शासनाचे असून, भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्याचे अधिकारही शासकीय यंत्रणेसच आहेत. परंतु, काही संस्था भ्रष्टाचारविरोधी नाव त्यांच्या संस्थेस असल्यामुळे, अधिकार्‍यांविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबतत कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत अथवा त्यांच्या संस्थेस आहेत असे समजून कार्यवाही करतात. त्यामुळे  या संस्थांच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भ्रष्टाचार निर्मूलन हा कुठल्याही संस्थेचा सामाजिक उद्देश असू शकत नाही.
संघटनेच्या नावात मानवाधिकार शब्द वापरून त्याचा गैरवापर करणार्‍याही काही संघटना असल्याचे निदर्शनास आले आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन झाले तर त्याबाबत दाद मागण्यासाठी अथवा त्याची दखल घेण्यासाठी शासनाने मानवाधिकार कार्यालयाची स्थापना केली आहे. असे असताना काही जण मानवाधिकार नावाचा वापर संस्थेच्या नावात करून फसवणूक करत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी  संघटना किंवा संस्थांना नोटीस काढून संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार निर्मूलन, भ्रष्टाचार आणि मानवाधिकार शब्द वगळण्याबाबत सूचना द्याव्यात. ज्या संघटना किंवा संस्था हे शब्द वगळणार नाहीत त्यांच्या विश्‍वस्तावर कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये अशा संघटनांचे पेव फुटू लागले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाबरोबरच मानवधिकार हा एक शब्द वापरून काही जणांनी संघटना काढल्या. संघटनांचे लेटरपॅड काढून त्यावर अनेकांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून आपले फोटोही लावले आहेत.