Mon, Jul 06, 2020 03:31होमपेज › Kolhapur › फड गाजवणारा नेता काँग्रेसमध्ये झाला दुर्मीळ

फड गाजवणारा नेता काँग्रेसमध्ये झाला दुर्मीळ

Published On: Apr 19 2019 1:49AM | Last Updated: Apr 18 2019 8:54PM
सुरेश पवार

संघटना खिळखिळी झालेली, कार्यकर्ते सैरभैर झालेले आणि आपापल्या सवत्यासुभ्यात नेते गर्क झालेले, अशी काँग्रेसची गलितगात्र अवस्था असतानाच, पक्षाची आणखी एक कमतरता प्रकर्षाने पुढे आली आहे. ती म्हणजे, जाहीर सभेत फड गाजवणार्‍या फर्डे वक्‍तृत्व असणार्‍या नेत्याची! राज्य पातळीवर भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे फर्ड्या वक्त्यांची पलटण आहे. या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही फड गाजवण्यात पटाईत आहेत; पण काँग्रेस पक्षात मात्र असा प्रभावी वक्‍ता असलेला नेता शोधावा लागत आहे. 

महाराष्ट्रात एकेकाळी बलाढ्य पक्ष असलेल्या काँग्रेसला यापूर्वी कधी प्रभावी भाषण करणार्‍या नेत्यांची उणीव नव्हती. कै. यशवंतराव चव्हाण अमोघ वक्‍तृत्वाबद्दल प्रसिद्ध होते. कै. बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते आक्रमक भाषणे करीत. कै. वसंतरावदादा पाटील, राजाराम बापू पाटील हे जनतेला विश्‍वासात घेत भाषणे करीत. संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यावेळी आणि नंतरही विरोधकांच्या मुलूखमैदान तोफा धडाडत असताना, यशवंतराव चव्हाणांसह काँग्रेस नेत्यांनी त्याला तोडीस तोड उत्तर दिले होते. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, कॉ. श्रीपाद डांगे, नाथ पै, मधू लिमये, मधू दंडवते, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा दिग्गज नेत्यांबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी सामना केला होता. 

या नेत्यांच्या वक्‍तृत्वाचा आणि पक्ष संघटनेचाही वारसा पुढील पिढीकडे फारसा राहिला नाही. ऐंशीच्या दशकात पक्ष संघटना भक्‍कम असल्याने फर्ड्या वक्त्याचा अभाव फारसा जाणवत नव्हता; पण 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि त्यानंतर म्हणजे गेल्या 20 वर्षांत काँग्रेस पक्षातील ही कमतरता उघडी पडली आहे.

माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख हे फर्डे वक्‍ते होते. आक्रमक शैलीत प्रतिपक्षाचा समाचार घेण्यात ते तरबेज होते. चपलख कोट्या करीत जनसमुदायाला मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्या वक्‍तृत्वात होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही पट्टीचे वक्‍ते आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील आदी स्टार प्रचारक आहेत. तथापि, यापैकी सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण स्वत:च निवडणूक आखाड्यात आहेत, तर विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हे भाजपमध्ये गेल्याने, ते प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत.

राज्यपातळीवर भाजपकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे अशी वक्त्यांची फौज आहे. शिवसेनेकडे उद्धव ठाकरे, दिवाकर रावते, रामदास कदम, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे अशी टीम आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह या पक्षात अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशा वक्त्यांचा ताफा आहे. या तिन्ही पक्षांकडे जिल्हा पातळीवरही चांगले वक्‍ते आहेत. काँग्रेसकडे मात्र त्याचा अभाव आहे आणि आता उसने प्रचारक आणण्याचा प्रसंग पक्षावर ओढवला आहे.

गेल्या 8-10 वर्षांत राज्यात काँग्रेस पक्षाची पडझड होत असताना प्रभावी वक्त्यांचीही चणचण भासावी, हे पक्षाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. गेल्या 8-10 वर्षांत पक्षात फारसे नवे कार्यकर्ते आले नाहीत. नेतृत्व तयार झाले नाही. एकेकाळी पक्षाची अभ्यास शिबिरे होत. त्यात पक्षाचे ध्येयधोरण स्पष्ट होत असे. तरुण वक्त्यांना व्यासपीठावर संधी मिळे. त्यातून नवी पिढी तयार होत असे. आता ती शिबिरे इतिहासजमा झाली. पक्षाची वाढ खुंटली, त्याला हेही एक कारण म्हणता येईल.