Fri, Jul 10, 2020 21:29होमपेज › Kolhapur › खंडपीठ लढ्याचे नव्याने रणशिंग

खंडपीठ लढ्याचे नव्याने रणशिंग

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 1:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याचे शुक्रवारी नव्याने रणशिंग फुकण्यात आले. उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावे असा राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, एक फेब्रुवारीपर्यंत निर्णय झाला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, त्याकरिता यापुढे सहा जिल्ह्याच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांची खंडपीठ कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय सहा जिल्ह्यातील वकिलांच्या शुक्रवारच्या बैठकीत घेतला. मार्केट यार्ड येथील बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये  बैठक झाली. 

कराडचे अ‍ॅड. संभाजीराव मोहिते म्हणाले, राज्य शासन आपली फसवणूक करत आहे. खंडपीठाबाबत ठोस कृती कार्यक्रम ठरवला पाहिजे आणि तो राबविला पाहिजे. 

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण म्हणाले, खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन हे एक प्रभावी हत्यार आहे. यामुळे एकजुटीने आणि मनापासून सर्वांनी काम केले पाहिजे. 

सातार्‍याचे अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी राज्य शासनाने खंडपीठासाठी 1100 कोटी  तरतूद केली. या निधीचे काय झाले याची सरकारकडे विचारणा केली पाहिजे, असे सांगितले. सांगलीचे अ‍ॅड. श्रीकांत जाधव म्हणाले, खंडपीठ जागेसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल. 

अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते. ठराव आजतागयात प्रलंबित ठेवला आहे. हा खेळखंडोबा सुरू आहे. चर्चेने प्रश्‍न सोडवण्याचे दिवस आता गेले आहेत. आंदोलनाखेरीज दुसरा पर्याय नाही. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांनी समारोप केला.  यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेकर,  संजीवनी खांडेकर, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, संपतराव पवार यांनीही भूमिका मांडल्या. बार असोसिएशनचे सचिव किरण पाटील यांनी स्वागत केले. या बैठकीला शैलेंद्र हिंगमिरे,  वैभव काटकर, भगवंतराव सानप, संजय महाडिक, बी. बी. भादोले, धनंजय पठाडे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, राजेंद्र चव्हाण, आसावरी कुलकर्णी, नारायण भांदिगरे, सतीश कुंभार, प्रवीण कालेकर,  रोहन पाटोळे,  सत्वशील लाड, संग्राम चव्हाण, दीप्ती घाटगे, कल्पना माने, सूरमंजिरी लाटकर आदी उपस्थित होते.

विविध ठराव...

या बैठकीत खंडपीठाची विधिमंडळात मागणी केल्याबद्दल शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. माहितीच्या अधिकाराखाली मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी खंडपीठाबाबत दिलेला अहवालाच्या प्रती उपलब्ध करून द्यावे, असे आदेश देण्यास भाग पाडल्याबद्दल सर्जेराव खोत यांच्याही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. ग्राहक न्यायालयाच्या सर्किट बेंचचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तो वाढवून दर महिन्याला 15 दिवस करावा, असा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.