Mon, Jul 06, 2020 22:13होमपेज › Kolhapur › मास्तर एवढंच बाकी राहिलं होतं...

मास्तर एवढंच बाकी राहिलं होतं...

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:23PMकोल्हापूर : विकास कांबळे

सध्या शिक्षक आपल्या कारनाम्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. शिक्षकी पेशा सांभाळून अनेकजण आपला व्यवसाय साभांळत असतात; पण कोणता व्यवसाय किंवा धंदा करावा, याचे भानही त्यांना राहत नाही. त्यातूनच बार चालविणार्‍या शिक्षकांचा विषय गेल्या काही महिन्यात चर्चेत आला होता. नरतवडे येथील प्रकरणाने तर त्यावर कळस करत एका शिक्षकाने चक्‍क सावकारीच सुरू केल्याच्या चर्चेने आता ‘एवढंच बाकी रहिलं होतं’ असे म्हणण्याची वेळ मास्तरांनी आणली आहे.

शिक्षकांना समाजामध्ये पूर्वी खूप मानाचे स्थान होते. सध्या ती परिस्थिती आहे की नाही, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. शिक्षक गावात आल्याचे समजले की मुले दफ्तर घेऊन शाळेत पळायची, अशी परिस्थिती होती. त्या काळात खासगी शाळा फारशा नव्हत्या. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळांशिवाय पर्याय नव्हता. नागरिकरणाचा वेग जसा वाढू लागला तसे खासगी शिक्षण संस्थांचे पेव फुटू लागले. पूर्वी किमान शिक्षण संस्थांना अनुदान मिळत असे, मात्र आता विनाअनुदानित शाळा काढून लोक शिक्षणसम्राट बनण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.  याच दरम्यान इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे फॅड वाढू लागले. त्याचा परिणाम केवळ सरकारी मराठी शाळांवर झाला नाही तर खासगी मराठी शाळांवरदेखील त्याचा परिणाम झाला. 

विशेषत: तालुका किंवा शहराला  लागून असलेल्या सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. या परिसरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात घटल्याने शिक्षकांचे काम कमी होऊ लागले. रिकाम्या वेळेत ते राजकारण करू लागले. काही शिक्षकांनी आपले व्यवसाय सुरू केले. करण्यासही हरकत नाही, पण किमान समाजातीला आपले स्थान पाहून तरी त्यांनी व्यवसायाची निवड करणे अपेक्षित आहे. मात्र, बार चालविण्यापर्यंत काही शिक्षकांची मजल गेली.

त्याहीपुढे जात आता काही शिक्षकांनी सावकारी सुरू केल्याची चर्चा नरतवडे येथील प्रकरणावरून सुरू झाली. घेतलेली मूळ रक्‍कम व्याजासह परत दिल्यानंतर या नाथाला दुसर्‍याच्या जागेचा मोह सुटेना. म्हणून त्यांने चक्‍क गुंडगिरी करण्यास सुरुवात केली. त्याच्या या पठाणी व्याजाच्या धास्तीने एकाने आत्महत्या केल्याच्या आरोपाने शिक्षकांच्या सावकारी व्यवसायाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे ‘मास्तर, एवढंच राहिलं होतं’, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.