Wed, Aug 12, 2020 03:50होमपेज › Kolhapur › इस्लामपुरातील कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कातील मुलीचे वास्तव्य पेठवडगावात

इस्लामपुरातील कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कातील मुलीचे वास्तव्य पेठवडगावात

Last Updated: Mar 25 2020 11:49PM
पेठवडगाव : पुढारी वृतसेवा

इस्लामपुरातील कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या येथील एका कुटुंबाचा संशय आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील संशयित रुग्णांना तत्काळ इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. यामध्ये एका चिमुकल्यासह 11 सदस्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबाचे नाव उघड झाल्याने पेठवडगावमध्ये खळबळ उडाली आहे.

पेठवडगाव येथील एका नागरिकाची सासूरवाडी इस्लामपूर येथे आहे. या सासूरवाडीतील चार जणांना कोरोनाची लागण  झाल्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या नागरिकाची 20 वर्षाची मुलगी इस्लामपूर येथे शिक्षण घेते व ती या बाधित कुटुंबासोबत राहते. काही दिवसांपूर्वी इस्लामपुरातील संशयित कुटुंब सौदी अरेबियाला यात्रेसाठी गेले होते. यनिमित्त आयोजित कार्यक्रमास पेठवडगाव येथील या कुटुंबातील काही सदस्य गेले होते. गेल्या चार दिवसांपासून इस्लामपूर येथील त्या 20 वर्षाच्या मुलीचे वास्तव्य  पेठ वडगावात असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

या कुटूंबियाची दोन मेडिकल दुकाने आहेत. व्यवसायाच्या निमित्याने या कुटूंबियाचा नागरिकाशी दररोजचा  संपर्क आहे. या कुटूंबियाचा थेट  कोरोना बाधीत क्षेत्रात संपर्क झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी  झाली आहे. मुख्याधिकारी सुषमा शिंदे -कोल्हे यांनी आरोग्य विभागाचे पथक  पाठवून या कुटूंबियाची चौकशी केली.या कुटूंबियांतील 11 जणांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इचलकरंजी नेण्यात आले. या सर्वांचे घशातील  स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असून ते टेस्टसाठी पुण्याला पाठवण्यात  आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत इंदिरा गांधी इस्पितळातून 16 जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या वैद्यकीय  अहवालाची प्रतीक्षा आहे.

गेल्या चार दिवसापासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन शहरात जनजागृती करण्याचे काम  करीत  आहेत. सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणून शहराच्या प्रवेश करणार्‍या सीमा बंद  करण्यात आल्या आहेत.