Wed, Jul 08, 2020 10:11होमपेज › Kolhapur › कोरे-पाटील यांच्यातच सामना

कोरे-पाटील यांच्यातच सामना

Published On: Sep 17 2019 1:51AM | Last Updated: Sep 16 2019 9:13PM
पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, जनसुराज्य शक्‍ती यांच्यामध्येच सामना रंगणार, असे चित्र आहे. हा मतदारसंघ भाकरी परतवण्यात पटाईत आहे. पन्हाळा तालुका भौगोलिकदृष्ट्या विभागला आहे. या तालुक्याचा कळेकडील काही भाग करवीर विधानसभा मतदार संघास व पूर्व भाग पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघास  जोडला आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांचा फक्‍त 388 मतांनी निसटता पराभव झाला होता. या पराभवाची सल भरून काढण्याची पुरेपूर तयारी विनय कोरे यांनी केली आहे. दुसरीकडे आ. सत्यजित पाटील यांनीही विकास कामाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवला आहे. पन्हाळा तालुक्यातील माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील गटाचे नेते अमर पाटील यांच्याबरोबर विनय कोरे  यांनी राजकीय स्नेह जोडल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

हातकणंगले लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता पन्हाळा तालुक्यातील मतदारांनी शिवसेनेला झुकते माप दिल्याचे दिसते. यावरून अनुमान काढायचे म्हटले, तर तालुक्यात शिवसेना जोमाने वाढत असल्याचे दिसून येते, हे नाकारून चालणार नाही. पन्हाळा तालुक्यात पंचायत समिती व पन्हाळा नगरपालिकेवर जनसुराज्य पक्षाची सत्ता आहे. विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्‍ती पक्षाने भाजपसोबत युती केल्याचा मोठा फायदा जनसुराज्य पक्षाला झाला आहे. जनसुराज्य शक्‍ती पक्षाला दोन महामंडळांची उपाध्यक्षपदे देण्यात आली आहेत. काँग्रेसचे शाहूवाडीचे नेते करणसिंह गायकवाड यांनी विनय कोरे गटाला बळ दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत करणसिंह गायकवाड गटाचे बळ विनय कोरे यांना मिळणार असून, ही जनसुराज्य पक्षाची जमेची बाजू समजली जात आहे. 

भाजप व शिवसेना हे केंद्रात आणि राज्यातही सत्तेत आहेत. कोरे यांनी पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघासह नऊ विधानसभा मतदार संघाची भाजपकडे मागणी केली आहे. मात्र, पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदार संघाचा विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने शिवसेना हा मतदार संघ भाजपसाठी सोडणार का, असा प्रश्‍न आहे. 

शिवसेना जर मतदारसंघ सोडण्यास तयार झाली नाही, तर भाजप विनय कोरे यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात सहकार्य करणार का, हा प्रश्‍न आहे.  हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यास आला, तर शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते विनय कोरे यांना मदत करतील का, असे अनेक प्रश्‍न आहेत. एक मात्र निश्‍चित, की पन्हाळा-शाहूवाडीमध्ये आ. सत्यजित पाटील विरुद्ध माजी मंत्री विनय कोरे अशीच लढत होणार, यात शंका नाही.