Wed, Sep 23, 2020 09:00होमपेज › Kolhapur › गारगोटीतील तोतया सीआयडी इन्स्पेक्टर युवती गजाआड; नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा 

गारगोटीतील तोतया सीआयडी इन्स्पेक्टर युवती गजाआड

Last Updated: Aug 03 2020 2:39PM
भुदरगड तालुक्यात एकच खळबळ : वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे दणाणले धाबे

गारगोटी (जि. कोल्हापूर ) : पुढारी वृत्तसेवा

सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचा रूबाब दाखवून सीआयडी पोलिस खात्यात नोकरीला लावतो, अशी बतावणी करून गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी इन्स्पेक्टर युवतीला व तिच्या मामाला पोलिसांनी गजाआड केले. या दोघांनी मिळून भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना लाखो रुपयांचा गंडा घातला. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२, गारगोटी) व तिचा मामा विठ्ठल मारूती निलवर्ण (वय-३८, रा. निळपण) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकाराने भुदरगड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

दोन वर्षांपूर्वी प्रियांका हिने आपण सीआयडी इन्स्पेक्टर झाल्याची खोटी बतावणी करून गारगोटी शहरात पोस्टर झळकावली होती. या माध्यमातून तिने सत्कार करून घेऊन आपली सीआयडी इन्स्पेक्टर अशी इमेज तयार करून घेतली. तिच्या या भुलथापावर लोकांचाही विश्‍वास बसला गेला. या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार युवक-युवतींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामांनी लाखो रूपये जमा केले.

२५ जुलै रोजी प्रियांका व तिचा मामा विठ्ठल याने निळपण (ता. भुदरगड) प्रतीक्षा साळवी हिच्याकडून दहावी, बारावीचे मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखल्याच्या झेरॉक्स तसेच ५ लाख २५ हजार रूपये घेऊन सीआयडी विभागाचे बनावट ओळखपत्र दिले. याबाबतची फिर्याद प्रतीक्षा हिने भुदरगड पोलिसात दिली असून याप्रकरणी प्रियांका चव्हाण व तिचा मामा विठ्ठल मारूती निलवर्ण यास ताब्यात घेतल्याचे समजते.

 "