Wed, Sep 23, 2020 07:45होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’ची दखल; महाराष्ट्र शासनाची कर्नाटक प्रशासनाशी चर्चा ः 1.80 लाख क्युसेक्सने विसर्ग

‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला

Last Updated: Aug 08 2020 1:26AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक प्रशासनाने अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग 1 लाखापेक्षा जास्त क्युसेक्सने वाढविताच सांगली जिल्ह्यातील पूर ओसरू लागला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील पूर पातळी सकाळपासून स्थिरावली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी राधानगरी धरणाचे 

4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग सुरू असतानाही अलमट्टीतून विसर्ग वाढवल्याने शुक्रवारी पंचगंगेची पातळी वाढली नाही. यावरून इथल्या पुराचे आणि अलमट्टीचे ‘कनेक्शन’ आणखी एकदा सिद्ध झाले आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या दोनच दिवसांत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण झाल्यानंतर पूरस्थिती विचारात घेऊन अलमट्टीतून विसर्ग वाढवावा, असा सल्ला देणारे वृत्त दै. ‘पुढारी’ने दि. 7 रोजी प्रसिद्ध केले होते. दोन्ही जिल्हा प्रशासनांना कर्नाटक प्रशासनाशी चर्चा करण्याचा सल्ला ‘पुढारी’ने दिला होता. त्यानुसार कार्यवाही झाल्याने अलमट्टीतून सोडला जाणारा 31 हजार क्युसेक्स विसर्ग शुक्रवारी सकाळी 1.50 लाख क्युसेक्स आणि दुपारी 1.15 वाजता 1.80 लाख क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला.

गुरुवारी अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517.76 मीटर एवढी होती. तसेच पाणीसाठा 94.36 टीएमसी झाला होता. धरणात प्रतिसेकंद 57 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत होती आणि आवकेपेक्षा कमी म्हणजे 32 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू होता. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मीटरच्या वर गेली की, कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला महापुराचा वेढा पडायला सुरुवात होते, हे यंदाही प्रत्ययाला येऊ लागले होते. गुरुवारी अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 518 मीटरपर्यंत वाढल्यामुळे आणि दोन्ही जिल्ह्यांतील धरणांमधून पाणी सोडलेले नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याचे, तर सांगलीत महापुराची चाहूल लागल्याचे दिसून आले होते.

याबाबत दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी अलमट्टीतील पाणीसाठ्यामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करून अलमट्टीतील पाणी पातळी कमी करून एक लाखावर विसर्ग वाढवावा, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी चर्चा करून शुक्रवारी सकाळी अलमट्टी धरणाचा विसर्ग 32 हजारांवरून थेट 1.50 लाख क्युसेक्स इतका वाढविण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर दुपारी 1.15 वाजल्यापासून विसर्गाचे प्रमाण आणखी वाढवून 1 लाख 80 हजार इतके करण्यात आले आहे. राजापूर बंधार्‍यावरून सध्या  75 हजार क्युसेक्स विसर्ग अलमट्टीकडे होत आहे. आवकेपेक्षा जादा विसर्ग अलमट्टी धरणातून सुरू आहे.

दरम्यान, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविताच सांगलीतील पाण्याची पातळी झपाट्याने उतरायला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सांगलीतील आयर्विन पुलानजीक पाणी पातळी एक फुटाने उतरली होती. 

कृष्णा-वारणा-पंचगंगा नद्यांना राजापूर बंधार्‍याच्या अलीकडेपर्यंत फूग असल्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची पातळी स्थिर असल्याचे दिसत आहे. मात्र, अलमट्टीतील विसर्ग वाढल्यामुळे राजापूरनजीकचा फुगवटाही कमी होऊन कोल्हापुरातील पूर ओसरण्याची शक्यता आहे.

डोन्ट वरी..! : जयंत पाटील

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, मी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना मी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आमचे अधिकारी आणि कर्नाटकच्या अधिकार्‍यांनी आज बोलून विसर्ग निश्‍चित केला आहे. कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता बाळगू नये. डोन्ट वरी, अशा शब्दांत ना. पाटील यांनी दोन्ही जिल्ह्यांतील जनतेला दिलासा दिला आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांची पालकमंत्र्यांशी चर्चा; कर्नाटक प्रशासनाने विसर्ग वाढवला

कोल्हापूर आणि सांगलीला असलेल्या महापुराच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी गुरुवारी रात्री दूरध्वनीवरून चर्चा केली. अलमट्टी धरणातून कमी प्रमाणात होणारा पाण्याचा विसर्ग आणि कोल्हापूरची वाढती पूर पातळी याबाबत कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करावी आणि अलमट्टीचा विसर्ग वाढवावा. तो वाढवला तरच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर पातळी कमी होईल, असा सल्ला डॉ. जाधव यांनी पाटील यांना दिला होता.

यानंतर पालकमंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा अधिकार्‍यांनी अलमट्टी प्रशासन आणि कर्नाटकातील स्थानिक जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून विसर्ग वाढवण्याबाबत सूचना केली. त्यानुसार सकाळी अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवण्यात आला. गुरुवारी अलमट्टीचा विसर्ग 38 हजार क्युसेक्स होता. आज सकाळी तो 1 लाख 50 हजार क्युसेक्स इतका करण्यात आला. दुपारी 1.15 वाजता तो 1 लाख 80 हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पूर पातळी कमी होऊ  लागली. कोल्हापूर जिल्ह्यातही गगनबावडा, राधानगरी आणि करवीर या तालुक्यांतील नद्यांची पूर पातळी झपाट्याने कमी होऊ लागली. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभर स्थिर 
राहिली.

याबाबत पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, डॉ. जाधव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत अलमट्टी प्रशासनाशी संपर्क करून कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी संपर्क साधला. त्यानंतर आज सकाळपासून अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधार्‍यावरून सध्या 75 हजार क्युसेक्स पाणी पुढे कर्नाटकात जात आहे, तर अलमट्टीतून 1 लाख 80 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कमी होण्यास मदत होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
 

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण पूरस्थिती विचारात घेऊन मी कर्नाटक जलसंपदा विभागाशी संपर्क साधून विसर्ग वाढविण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी 32 हजारांवरून 1.50 लाख क्युसेक्सने विसर्ग वाढविला. दुपारी परत विसर्ग 1.80 लाख क्युसेक्सपर्यंत वाढविला आहे. अलमट्टीप्रकरणी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणे चालू ठेवले आहे.
- हणमंतराव गुणाले, 
अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग


 

 "