Fri, Jul 10, 2020 19:50होमपेज › Kolhapur › जिल्ह्यावर युतीचा ताबा; आघाडीची दुर्दशा

जिल्ह्यावर युतीचा ताबा; आघाडीची दुर्दशा

Published On: May 26 2019 12:36PM | Last Updated: May 26 2019 12:36PM
विकास कांबळे: पुढारी ऑनलाईन

खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे फिरविलेली पाठ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार असतानाही तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका, त्यातून नाराज झालेले कार्यकर्ते, त्यांची नाराजी दूर करण्यात आलेले अपयश, मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्याच्याकडे पाहतात त्या काँग्रेसमधील काहीजणांनी केलेला टोकाचा विरोध, शेवटच्या टप्प्यात जे मदत करतील असे वाटत होते त्यांनीच मतदानाच्या अगोदर काही तास टाकलेला ‘बॉम्ब’ आणि भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक केलेले काम, यामुळे सर्व गोष्टी उजव्या असतानाही धनंजय महाडिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधी उमेदवाराच्या तुलनेत प्रचार यंत्रणेसह सर्वच बाबी अधिक सरस असतानाही या निवडणुकीत झालेल्या पराभवाने महाडिक काही तरी शिकतील, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. धनंजय महाडिक व शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक हे गेल्या निवडणुकीतीलच उमेदवार यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीतदेखील एकमेकांसमारे उभे ठाकले होते. उमेदवार म्हणून महाडिक व प्रा. मंडलिक यांची तुलना केली असता, महाडिक हे सरस वाटत होते. गेल्या निवडणुकीत प्रा. मंडलिक यांना त्यांनी पराभूत केले होते. यावेळीदेखील त्यांचेच पारडे जड होते. मात्र, प्रा. मंडलिक यांच्या बाजूने काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील उघडपणे उतरले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. बघता बघता वारे बदलत गेले.

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वच पक्षांच्या वतीने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार म्हणून धनंजय महाडिक व पराभूत होऊनदेखील गेल्या पाच वर्षांत शिवसेनेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल प्रा. मंडलिक यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित होती. महाडिक यांना पक्षातून इतका टोकाचा विरोध झाली की, त्यांना उमेदवारी मिळते की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा कार्यकर्ते करू लागले. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांच्यासह बहुतांशी पदाधिकार्‍यांनी महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठा भाऊ म्हणून काँग्रेसकडे पाहतात. ते प्रामाणिकपणे काम करतील, असे वाटत होते; पण त्यांच्यातीलच काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नकाराच्या सुरात सूर मिसळण्यास सुरुवात केली. त्यामुळे पात्रता फेरीतच महाडिक यांना घाम फुटण्याची वेळ आली होती. 

मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी सर्वांकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा महाडिकांवर विश्‍वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील चित्र बदलेल, असे महाडिक यांना वाटत होते. वरकरणी तसे दिसूही लागले; मात्र जे दिसत होते तसे नव्हते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. हे मान्यच करावे लागेल. आ. पाटील व महाडिक यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू असतानाही आ. मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना आ. पाटील यांच्या निवासस्थानी घेऊन जात दोघांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. आ. पाटील यांनी आघाडी धर्म पाळत सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक झाली. महाडिक खासदार झाले. त्यानंतर मात्र त्यांच्या वर्तनात खूप बदल झाला. 

यानंतर सहा महिन्यांच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आ. पाटील यांना मदत करणे लांबच, उलट त्यांना पाडण्यात महाडिक यांनी पुढे राहण्यात धन्यता मानली. यानंतर
आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आ. मुश्रीफ यांनी त्यांना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात मदत करण्याची विनंती केली. यावेळी महाडिक यांनी त्यांना आपण
खा. पवार यांच्याशी बोललो आहे. माझी अडचण असल्यामुळे मी सहभाग घेऊ शकत नाही, असे स्पष्टपणे ऐकवले. हे आ. मुश्रीफ कसे विसरतील? महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा निवडणूक रिंगणात होत्या. त्या पराभूत झाल्या. त्यांना पराभूत करण्यासाठी जोडण्या लावण्यात महाडिक यांच्या जवळचेच लोक होते. हे पाटील कुटुंब लगेच कसे विसरतील?

 महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या वडिलांवर आणि घरावर महाडिक यांच्या समर्थकांनी केलेला हल्‍ला लाटकर कसा विसरतील? आणि सर्वात महत्त्वाचे, लोकसभेला मदत करूनही विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यात जे लोक आघाडीवर होते, त्यामध्ये लोकसभेला मदत केलेले महाडिकदेखील होते. हे आ. सतेज पाटील कसे विसरतील? हे महाडिक यांच्या लक्षात आले नाही  त्यांना वाटले गेल्यावर्षीप्रमाणे आ.मुश्रीफ पक्षाचा आदेश आल्यास आ. सतेज पाटील यांना आपल्या मागून फिरावयास भाग पाडतील; पण आ. मुश्रीफ यांनी शेवटपर्यंत आ. सतेज पाटील यांच्याशी चर्चा करणार नाही, असे स्पष्टपणे पक्षाला सांगून टाकले. आ. मुश्रीफ व त्यांचे कार्यकर्ते महाडिक यांच्यावर नाराज होतेच. ती नाराजी कागलमधील सभेत महाडिक यांनी आ. मुश्रीफ यांचे
नाव न घेतल्याच्या निमित्ताने गोंधळ करून व्यक्‍त केली. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक प्रचारात सहभागी झाले नाहीत.

 भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारातदेखील भाजपचे काही नगरसेवक नव्हते. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत चांगलीच मिसळ झाली होती. दुसरीकडे, काँग्रेसचे आ. पाटील यांनी तर महाडिक यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्याचा चंगच बांधला आहे. त्यांनी उघडपणे ‘आमचं ठरलंय’ असे सांगण्यास सुरुवात केली. ‘आमचं ठरलंय’ हा शब्द मतदारसंघात एवढा गाजू लागला की, त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. पवार यांनादेखील घ्यावी लागली. त्यामुळे आ. सतेज पाटील यांचे ‘आमचं ठरलंय’ संपूर्ण राज्यात गाजले.


काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध पत्करून धनंजय महाडिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधली. खासदार झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांपेक्षा महाडिक विरोधी पक्षाच्या नेत्यांजवळच अधिक रमू लागले. त्याचा फायदा काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा अनेक ठिकाणी भाजपला झाला. त्यामुळे अंतिम टप्प्यात भाजपचे जिल्ह्यातील नेते आपणास मदत करतील, अशी अपेक्षा महाडिक यांना होती. 


मात्र, काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले महाडिक यांना भाजपची संस्कृती माहीत नव्हती. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना जवळून पाहावयास मिळाली म्हणण्यापेक्षा त्याचा त्यांना चांगला अनुभव आला. पक्षाच्या विचारांशी अतिशय प्रामाणिकपणे राहणार्‍या या पक्षातील नेत्यांनी मतदानाच्या दोन दिवस अगोदर महादेवराव महाडिकांचे नाव घेऊन बॉम्बच टाकला. त्यामुळे खा. पवार यांचे पाच ते सहा वेळा दौरे होऊनदेखील त्याचा काही फायदा झाला नाही. 

यापूर्वी कै. सदाशिवराव मंडलिक यांना पराभूत करण्यासाठी खा. पवार असेच पाच ते सहा वेळा कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. या लोकसभा निवडणुकीतदेखील तेच पाहावयास मिळाले. दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावली. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर आपल्या होमटाऊनमधील दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.

त्यासाठी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सक्‍त सूचना दिल्या होत्या. युतीच्या सर्व आमदारांनी विधानसभेची रंगीत तालीम या माध्यमातून करून घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये फक्‍त 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राहिलेल्या 4 आमदारांपैकी 3 आमदार शिवसेनेचे व 1 आमदार भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यामध्ये शिवसेनेचे प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके व राजेश क्षीरसागर या तीन आमदारांनी आपापल्या मतदारसंघात पूर्णपणे ताकदीने काम केले आहे. करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विधानसभेला पाडण्याची भाषा वापरली, तरीही नरके यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.


उलट जोरात कामाला लागले आणि त्याचा परिणाम निकालादिवशी कळला. राधानगरी- भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर हे तर  कै. सदाशिवराव मंडलिक यांचे कार्यकर्ते. त्यांनीही आपल्या मतदारसंघात प्रामाणिक काम केले. आ. राजेश क्षीरसागर यांनी उत्तरमध्ये गेल्या लोकसभेपेक्षा यावेळी मंडलिक यांना जादा मताधिक्य मिळवून दिले आहे. दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक आहेत. हे मात्र भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसले नाहीत. 

कागल व चंदगड विधानसभामतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कागलमध्ये पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे व संजय घाटगे यांनीदेखील रान उठवले होते. समरजित घाटगे गेल्या चार वर्षांपासून मतदारांच्या संर्कात आहेत. लोकसभेच्या निमित्ताने त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. कागल हे मंडलिकांचे होमपीच आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना सहानुभूती होती. त्यामुळे स्थानिक आमदार व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रामाणिकपणे काम करूनही फारसा उपयोग झाला नाही. सर्वच गटांचे कार्यकर्ते ‘खासदार आमचाच’ अशी घोषणा द्यायचे. तब्बल पाऊण लाखाचे मताधिक्य त्यांना मिळाले.


चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्यादेवी कुपेकर आमदार आहेत. महाडिक व कुपेकर नातेवाईक आहेत. या ठिकाणी कै. नरसिंग गुरुनाथ पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, गोपाळराव पाटील हे प्रमुख गट आहेत. याशिवाय दौलत साखर कारखान्याचे राजकारण आहे. चंदगड प्रा. मंडलिक यांची सासरवाडी आहे. त्यामुळे या मतदारसंघातही त्यांना चांगली आघाडी मिळाली.

या सर्व गोष्टी पाहता धनंजय महाडिक हे स्वत:च्या पराभवासाठी स्वत:च जबाबदार आहेत, असेच म्हणावे लागेल. कारण, प्रा. संजय मंडलिक यांच्यापेक्षा ते उजवे उमेदवार असताना, पाच वर्षांत त्यांनी अनेक विकासकामे केली, अल्पावधीत संसदेत आपली छाप पाडण्यात यशस्वी झाले आणि प्रचाराची यंत्रणा प्रा. मंडलिक यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सक्षम असतानादेखील त्यांना पराभवाला सामोर जावे लागले. यातून निश्‍चितपणे ते शिकतील.

कारण, शेवटी कोल्हापूरची जनता महत्त्वाची आहे. कोल्हापूरच्या जनतेला गृहीत धरण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर त्याला ती दाद देत नाही. अशावेळी ही जनता निवडून आणण्याऐवजी कोणाला पाडायचे हे ठरवते. मग समोरची व्यक्‍ती कोणीही असो.यापूर्वीदेखील जनतेने भल्याभल्यांना दाखवून दिले आहे.