Thu, Sep 24, 2020 11:03होमपेज › Kolhapur › ग्राहक खेचण्यासाठी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकांची स्पर्धा

ग्राहक खेचण्यासाठी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकांची स्पर्धा

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 11 2019 11:14PM
कागल : बा. ल. वंदूरकर

चौपदरी महामार्गावरील हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट आणि गार्डन यांच्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक ईर्ष्या लागली असून, महामार्गावरून जाणार्‍या प्रवाशांचे लक्ष वेधून त्यांना आकर्षित करण्यासाठी दिवसरात्र विशिष्ट प्रकारची लाईट असलेल्या पाईप आणि फलक घेऊन कर्मचार्‍यांना महामार्गावर उभे करण्यात येत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांतील ईर्ष्या  आता जीवघेणी बनू लागली आहे.

चौपदरी महामार्गावर दररोज नवनवीन हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट आणि गार्डनची भर पडत आहे. सर्व प्रकारच्या सुखसोयींचे फलक लावले जात आहेत. नव्याने सुरू केलेल्या ठिकाणी काही दिवसातच दुसरे हॉटेल उभे केले जात असून हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ईर्ष्या  निर्माण होत आहे. या ईर्ष्येतूनच सातारा, कराड, कोल्हापूरपर्यंत अनेक ठिकाणी महामार्गावरील प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालक विविध प्रकारच्या क्लृप्त्या लढवित आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाच्या झळा सोसत कर्मचार्‍यांना विशिष्ट प्रकारच्या पाईप घेऊन महामार्गावर उभे केले जात आहे. दिवसा त्यांच्या हातात पाईपबरोबरच शिट्ट्या असतात. रात्रीच्या वेळी त्यांच्या हातात लाल आणि पांढर्‍या रंगाची लाईट असलेल्या पाईप असतात. प्रवाशांच्या गाड्या चालल्या की, लाईट पाईपाचा इशारा दाखवून आपल्या हॉटेलकडे आकर्षित करीत असतात. दिवसा लाईटच्या पाईप आणि ‘हातात जेवण तयार आहे,’ असे फलक दिलेले असतात.

प्रवाशांना आवताण अपघाताला निमंत्रण

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कर्मचारी भर उन्हात दिवसभर उभे असतात. पावसात आणि थंडीत देखील हा प्रकार सुरूच असतो. एकाच ठिकाणी जादा हॉटेल असतील तिथे अंतरा - अंतरावर कर्मचारी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ करीत असतात. काही वेळा महामार्गावरील पांढरापट्टादेखील पार करून पुढे जात असतात. या कामासाठी वयोवृद्ध तसेच तरुणांचा वापर केला जात आहे. अशा वेळी अपघाताची शक्यता निर्माण होते. कधी - कधी महामार्गाच्या कडेने जाणार्‍या मोटारसाकलस्वारांना त्यांचा अडथळा निर्माण होत आहे. असे प्रकार आता वाढत आहेत. अपघातांना निमंत्रण देत आहेत.