Thu, Feb 27, 2020 23:23होमपेज › Kolhapur › वाहनांच्या ताकतुंब्याने शहर वेठीस

वाहनांच्या ताकतुंब्याने शहर वेठीस

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 10:46PMकोल्हापूर : विजय पाटील 

माझी गाडी वीस लाखांची आहे किंवा ती 180 च्या स्पीडने पळते असा मिशीवर ताव मारत तुम्ही कोल्हापुरात तर रुबाब मारू शकत नाही. कारण शहरातील मुख्य रस्त्यांवर तुमच्या हायफाय गाडीला आमच्या पांडूतात्याची सायकल सहज ओव्हरटेक करून जाऊ शकते. मग बघताय काय रागाने! ओव्हरटेक केलंय वाघाने असे म्हणत तात्याने कॉलर टाईट का करू नये? कोल्हापूरच्या वाहतुकीचे हे बोलकं चित्र वेगाने धावणार्‍या जगाचा विचार करता मागासलेपणाचं लक्षण मानायलं हवं. कारण वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की रस्त्यांचा ताकतुंबा नित्याचा आहे. यामुळे कोणीही कुठेही वेळेत पोहोचत नाही. शहरच वेठीस धरल्याचा असा प्रकार सुरू आहे.  

स्टेशन रोडवर सतत वाहतुकीची कोंडी असते. हीच गत भाऊसिंगजी रोडची आहे. असाच प्रकार दसरा चौक ते बिंदू चौकाचा आहे. लक्ष्मीपुरी ते सुभाष रोडवर जातानाही गर्दीचा तिटकारा यायला लागतो. कर्कश हॉर्न वाजवला तरी समोरचे वाहन जागचे हालत नाही. कारण वाहनांच्या गर्दीत सगळ्यांचीच वाट काढण्याची घाई सुरू असते. राजारामपुरी आणि शाहूपुरीतील सर्व रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत असतात. गंगावेश ते रंकाळा  तर वाहनांच्या धुराने भरलेला दिसतो. 

शहराची लोकसंख्या साडेपाच लाखांच्या आसपास.रोज शहरात सात लाख वाहने ये-जा करतात. शहरातील मुख्य रस्ते सोडले तर अंतर्गत रस्ते  अरुंद आहेत. त्यामुळे बससारखे  अवजड वाहन असले तर संपूर्ण रस्ता ब्लॉक होतो. मग वाहतूक पोलिसांनी कितीही शिट्ट्या मारल्या  तरी त्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी असे मानणार्‍या निगरगट्ट्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कामावर जाणार्‍यांना वेळेत पोहोचता येत नाही. 

शाळेला जाणार्‍यांना उशीर होतो.  टाईम इज मनी नव्हे तर टाईम इज फनी असं शहरातील वाहतुकीचं भेसूर चित्र दिसतं.  सगळीकडेच रेटारेटी सुरू आहे.  वाहतुकीला कुणीच वाली नाही. अन्यथा अ‍ॅम्ब्युलन्स हॉस्पिटलला वेळेत पोहोचल्या असत्या आणि तीन वर्षांच्या हसर्‍या  ‘सोनू’ला पित्याच्याच मांडीवर जीव गमवण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली नसती. वाहनांच्या ताकतुंब्याने शहर आणखी किती दिवस वेठीस धरायचे! याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.