होमपेज › Kolhapur › गुर्‍हाळ हंगाम महिनाभर लांबणार

गुर्‍हाळ हंगाम महिनाभर लांबणार

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 1:19AMकोल्हापूर : विकास कांबळे

गुर्‍हाळघरांचा पट्टा या महिन्यापासून चढविण्यास सुरुवात होत असल्याने गुर्‍हाळघरांची घरघर हळूहळू सुरू होते; पण यावर्षी सतत पडणार्‍या पावसामुळे गूळ हंगामावर  परिणाम होणार आहे. त्यामुळे एक महिना उशिरा गुर्‍हाळघरे सुरू होण्याची शक्यता आहे. उसावर पडलेले रोग आणि सततच्या पावसामुळे उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ऊस उत्पादनातही घट होणार आहे.

गोडवा आणण्याबरोबरच औषधी गुणधर्म असलेल्या गुळाने कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले आहे. जागतिक बाजारपेठेत आजही कोल्हापुरी गुळाला मागणी आहे. त्याचा फायदा घेऊन राज्यातील काही जिल्ह्यांमधील गूळ उत्पादक कोल्हापूर नावाने आपला गूळ बाजारात आणत आहेत. पूर्वी साखर कारखानदारांकडून मिळणारा भाव कमी असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी गुर्‍हाळावर आपला ऊस नेत असत. त्यामुळे कोल्हापुरातील गुर्‍हाळे पूर्वी पावसाळा सुरू होईपर्यंत चालत असत. एकेकाळी जिल्ह्यात 1,200 गुर्‍हाळे होती. मात्र, नंतर या व्यवसायात अडचणी उभ्या राहू लागल्या. गुर्‍हाळावर काम करण्यास माणसे मिळेनाशी झाली. व्यवसायातील माणसं कमी होऊ लागल्याने आणि दराच्या अनिश्‍चिततेमुळे गुर्‍हाळघरे अडचणीत येऊ लागली. याच दरम्यान, साखर कारखान्यांकडून उसाला भाव चांगला मिळू लागल्याने शेतकरी आपला ऊस कारखान्यांना पाठवू लागले. त्यामुळे गुर्‍हाळांची संख्या कमी होऊ लागली. सध्या जिल्ह्यात 250 गुर्‍हाळे आहेत. असे असले तरी अडचणींना तोंंड देत अजूनही काही  शेतकर्‍यांनी कोल्हापुरातील गुर्‍हाळे टिकवून ठेवली आहेत.

साधारणपणे ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापासून गुर्‍हाळघरांच्या चरख्याचा पट्टा चढविला जातो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गुर्‍हाळे सुरू होतात. दिवाळीनंतर पूर्णक्षमतेने ही गुर्‍हाळे चालू होत असतात.  सतत पडणार्‍या पावसामुळे अजून एकही गुर्‍हाळ सुरू झालेले नाही. पावसामुळे अजूनही शेतात पाणी साचले असल्याने ऊसतोडणीसाठी आवश्यक असणारे वातावरण तयार झालेले नाही. ऊस पाण्याखाली अधिक दिवस राहिल्यामुळे बहुतांशी ठिकाणच्या उसाची वाढ खुंटली आहे. अशा उसापासून चांगला उतारा मिळत नाही. शिवाय, त्याचा गुळावरही परिणाम होत असतो. अपरिपक्‍व उसापासून गूळ तयार केल्यास तो गूळ नरम बनतो.  साठवणीदरम्यानही असा गूळ खराब होण्याची शक्यता असते.