Fri, Jul 10, 2020 08:21होमपेज › Kolhapur › ‘लक्ष्य’ महाराष्ट्र केसरी

‘लक्ष्य’ महाराष्ट्र केसरी

Last Updated: Nov 18 2019 1:26AM
कोल्हापूर : एकनाथ नाईक 

राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळेच कुस्ती ही कला कोल्हापुरात जोपासली आहे. बलदंड शरीर, खंबीर मन घडवायचे असेल तर कुस्तीशिवाय पर्याय नाही. हे ओळखून शाहू महाराजांनी या कलेला प्रोत्साहन दिले. तेव्हापासून कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशीच आहे. सोळावेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मानाची गदा कोल्हापूरने पटकावली आहे; पण गेली एकोणीस वर्षे महाराष्ट्र केसरी गदेसाठी संघर्ष सुरू आहे. 

पुणे येथे यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दंगल होणार आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी कौतुक डाफळे, संतोष लव्हटे, समीर देसाई, शिवाजी पाटील, उदयराज पाटील हे कोल्हापुरातून चर्चेत आहेत. 22 व 23 नोव्हेंबर रोजी निवड चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे, गेली दोन वर्षे कौतुक डाफळेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून उपस्थितांची वाहवा मिळविली आहे.

सन 2000 मध्ये विनोद चौगुले याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावून कोल्हापूरच्या कुस्तीला नवचैतन्य निर्माण करून दिले होते. गेली 19 वर्षे कुस्तीपंढरी या मानाच्या गदेपासून दूर आहे. सन 1961 मध्ये दिनकर दह्यारी यांनी प्रथम कोल्हापूरला हा किताब मिळवून दिला. यानंतर गणपत खेडकर (1964), चंबा मुत्नाळ (1967, 1968), दादू चौगुले (1970, 1971), लक्ष्मण वडार (1972, 1973), युवराज पाटील (1974), संभाजी पाटील (1982), सरदार खुशहाल (1983), नामदेव मोळे (1984), विष्णू जोशिलकर (1985), आप्पालाल शेख (1992) यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दंगलीत कुस्तीपंढरीचे वर्चस्व ठेवले होते. यानंतर विनोद चौगुले याने सन 2000 मध्ये महाराष्ट्र केसरी किताब पटकावून नवोदित मल्‍लांमध्ये चैतन्य आणले. 

माती आणि गादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू; पण त्या जणू दोन परस्परविरोधी कुस्त्या असल्याचा अकारण बुद्धिभेद केला गेला आणि मातीच्या कुस्तीला उतरती कळा लागली; पण कोल्हापूरसह अन्य ठिकाणी मातीवरची कुस्ती अजूनही जिवंत आहे. 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मॅटवर होते. मातीची जागा मॅटने घेतली असून, कोल्हापूरच्या मल्‍लांचा कुस्तीदरम्यान कस लागतो. त्यामुळेच कोल्हापूरचे मल्‍ल माती व मॅट या दोन्हीचा सराव करतात. 12 महिने मॅटवर आणि आखाड्यात घाम गाळून मल्‍लांचा या स्पर्धेसाठी सराव सुरू आहे. 19 वर्षांची महाराष्ट्र केसरी किताबाची प्रतीक्षा यंदा तरी संपणार का? असा प्रश्‍न कुस्तीप्रेमींमधून व्यक्‍त होत आहे.