Thu, Feb 20, 2020 18:47होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील शिक्षकांच्या बदल्यांची चर्चा मुंबईत

कोल्हापुरातील शिक्षकांच्या बदल्यांची चर्चा मुंबईत

Published On: Mar 17 2019 1:53AM | Last Updated: Mar 17 2019 1:08AM
कोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन बदली प्रक्रियेतून मार्ग काढत केलेल्या ‘अर्थ’पूर्ण बदल्यांची चर्चा थेट मुंबईपर्यंत गेल्याने बदली केलेल्या शिक्षकांची सर्व माहिती घेऊन शिक्षण सचिव असिम गुप्ता यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना थेट मुंबईला बोलावून घेतले. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. जानेवारीपासून एकाही शिक्षकाची बदली केली नसल्याचे गुप्ता यांना सांगण्यात आल्याचे समजते.

जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा विषय जिल्हा परिषदेत नेहमीच गाजत असतो. त्यातल्या त्यात शिक्षकांच्या बदल्यांचा विषय तर अधिकच गाजत असतो. यामध्ये ज्या शिक्षकाची बदली होते, त्या शिक्षकापेक्षा नेतेगिरी करत फिरणार्‍या शिक्षकांनाच अधिक ‘इंटरेस्ट’ असतो. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीच्या काळात एखाद्या पदाधिकार्‍याची किंवा सदस्याची जिल्हा परिषदेतील फेरी चुकेल; मात्र नेतेगिरी करत फिरणार्‍या काही शिक्षकांची फेरी मात्र चुकत नसल्याचे बोलले जाते.

जिल्हा परिषदेत बदल्यांमध्ये होणारे गैरव्यवहार, पक्षपातीपणा यामुळे शासनाने यावर्षीपासून शिक्षकांच्या बदलीचे जिल्हा परिषदेचे अधिकारच काढून घेतले. ऑनलाईन पद्धतीने शासनस्तरावरच बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याला बहुतांश शिक्षक संघटनांनी विरोध केला. शासनाच्या या निर्णयाला आव्हान देणार्‍या विविध ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या, तरीही शासनाने आपला निर्णय बदलला नाही. शासन आपला निर्णय बदलण्यास तयार होत नसल्याचे पाहिल्यानंतर यातून मार्ग शोधण्याचे प्रयत्न काही मंडळींनी सुरू केले आणि अर्थपूर्ण चर्चा करून काही शिक्षकांच्या बदल्या केल्या. ऑनलाईन पद्धतीने बदलीचे अधिकार शासनाला असतानाही स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्थानिक पातळीवर शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत, तशा पद्धतीने आमच्याही जिल्ह्यात बदल्या कराव्यात, अशी मागणी अन्य जिल्ह्यांतून शिक्षण विभागाकडे होऊ लागल्या. त्यामुळे मंत्रालयात कोल्हापूर बदली पॅटर्न चांगला गाजू लागला. 

निर्णयाकडे लक्ष लागून

बदल्या कशा पद्धतीने करण्यात आल्या आहेत, याची खास माहिती घेण्यासाठी शिक्षण सचिव गुप्ता यांनी ऑनलाईन व्यतिरिक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांच्या बदल्यांची माहिती तातडीने घेऊन येण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार या विभागातील अधिकारी मुंबईला जाऊन आले आहेत. त्यामुळे स्थानिक बदल्यांबाबत काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.