होमपेज › Kolhapur › टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना मान्यता देणारे अडचणीत

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना मान्यता देणारे अडचणीत

Published On: Dec 17 2018 1:20PM | Last Updated: Dec 17 2018 1:20PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्यात 2013 नंतरच्या टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना मान्यता देणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांवर काय कारवाई केली, याची विचारणा एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 2013 नंतर सेवेत असलेल्या आणि टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकार्‍यांकडून मागवली आहे. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक आणि त्यांना मान्यता देणारे शिक्षणाधिकारी अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराची (आरटीई) अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली आहे. ‘आरटीई’मधील कलम 23 अन्वये शिक्षकांच्या पात्रता निश्‍चित करण्याबाबतची तरतूद आहे. त्या अनुषंगाने शासनाने 13 फेब्रुवारी 2013 ला राज्यातील शिक्षणाचे स्तर निश्‍चित केले आहेत. त्याचबरोबर 2016 मध्ये शैक्षणिक अर्हताही निश्‍चित केली आहे. शासनाने शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या दिल्या आहेत. यासंदर्भात डी.टी.एड/ बी.एड. स्टुडंटस् असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. 

याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याचिकेच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षणाधिकार्‍यांनी 2013 नंतर मान्यता दिलेल्या आणि अद्याप टीईटी परीक्षा पास न झालेल्या शिक्षकांची माहिती वैयक्तिक मान्यतेच्या प्रतीसह प्राथमिक शिक्षण संचालनालय, तसेच विभागीय उपसंचालक कार्यालयास येत्या 21 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना ती उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाला आहे. त्यासाठी राज्याने पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य शासनाने कोणताही पाठपुरावा न करता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 2013 नंतरच्या टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना त्वरित कामावरून काढावे आणि त्यांना मान्यता देणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे संघटनेकडून करण्यात आली आहे. 
- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, 
डी.टी.एड/ बी.एड. स्टुडंटस् असोसिएशन