Wed, Aug 12, 2020 20:50होमपेज › Kolhapur › काँग्रेसच्या स्वाती यवलुजे कोल्‍हापूरच्या नूतन महापौर

काँग्रेसच्या स्वाती यवलुजे कोल्‍हापूरच्या नूतन महापौर

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 2:05AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे सुनील पाटील यांची शुक्रवारी निवड झाली. महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत यवलुजे यांनी भाजपच्या मनीषा कुंभार यांचा, तर पाटील यांनी ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांचा 33 विरुद्ध 48 मतांनी पराभव केला. सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. हात उंचावून झालेल्या मतदानात शिवसेनेने चार मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकली.

हसिना फरास व अर्जुन माने यांनी महापौर, उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक लागली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडीसाठी विशेष सभा झाली. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी महापौरपदासाठी आलेल्या अर्जांचे वाचन करून पीठासन अधिकारी खेमणार यांच्याकडे दिले. त्यानंतर खेमणार यांनी यवलुजे व कुंभार यांचे अर्ज वैध असल्याचे सांगून माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला. या कालावधीत कुणीच माघार घेतली नसल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. 

पहिल्यांदा कुंभार यांच्यासाठी मतदान झाले. त्यांना भाजप-ताराराणी आघाडीची 33 मते मिळाली. त्यानंतर यवलुजे यांच्यासाठी मतदान झाल्यावर त्यांना 48 मते मिळाली. खेमणार यांनी यवलुजे महापौरपदासाठी विजयी झाल्याची घोषणा केली. उपमहापौरपदासाठी कारंडे यांनी अर्जांचे वाचन करून ते खेमणार यांच्याकडे दिले. दोन्ही अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी देण्यात आला.

कुणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. भोपळे यांना 33, तर पाटील यांना 48 मते मिळाल्यावर खेमणार यांनी उपमहापौरपदासाठी पाटील विजयी झाल्याची घोषणा केली. विजयानंतर यवलुजे व पाटील यांचा खेमणार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनीही दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.