Sat, Sep 26, 2020 23:08होमपेज › Kolhapur › दहा महिन्यांत 200 वाहन परवाने निलंबित

दहा महिन्यांत 200 वाहन परवाने निलंबित

Published On: Dec 14 2018 1:45AM | Last Updated: Dec 14 2018 12:28AM
कोल्हापूर : सुनील सकटे 

ड्रंक अँड ड्राईव्ह, मोबाईवर संभाषण, एकेरी मार्गातून वाहतूक, अतिवेगाने वाहन चालविणे या आणि अशा विविध कारणांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने  गेल्या दहा महिन्यांत 207 वाहनधारकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले आहे. नव्वद दिवसांसाठी लायसन्स निलंबित झाल्याने वाहनधारकांत खळबळ उडाली आहे. 

देशभरात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या आहेत. एखाद्या युद्धापेक्षा जास्त जीवितहानी रस्ते अपघातात होत असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस अशा विविध विभागांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यासंदर्भात समिती नियुक्‍त केली आहे. या समितीने प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासनास अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक नियमांनुसार वाहनधाकांवर कठोर कारवाई  करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये वाहनधारकांवर जरब बसविण्यासाठी वाहतूक नियम मोडणार्‍याचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 

या आदेशानुसार देशभर कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या वर्षभरात मोबाईलवर संभाषण करणार्‍या 291 वाहनधारकांवर कारवाई केली असून यापैकी 65 वाहनधारकांचे ड्रायव्हिंग लायसन निलंबीत केले आहे. तर ओव्हरलोड वाहतूकीबाबत 1082 वाहनधारकांवर कारवाई केली आहे. त्यापैकी 142 वाहनधारकांचे ड्रायव्हिंग लायसन निलंबीत केले आहे. प्रादेशिक परिवहन विभागासह आणि शहर वाहतूक पोलीसांना कारवाईबाबत आदेश आहेत. वाहतूक शाखेतर्फे शहरात कडक तपासणी करुन वाहतूक नियमांचे उलंघन करणार्‍यांचे ड्रायव्हिंग लायसन ताब्यात घेउन निलंबनासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्याची तयारी केली आहे. यापूर्वी वाहतूक पोलीसांतर्फे केवळ कारवाई केलेल्या व्यक्‍तींची नावे पाठविण्यात येत असतं त्यामुळे ड्रायव्हिंग लायसनसंदर्भात कारवाई करणे कठीण होते. आता प्रादेशिक परिवहन पोलिसांना केवळ नावे न पाठविता ड्रायव्हिंग लायसन ताब्यात घेउन पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे भविष्यात शहरासह जिल्ह्यात कडक मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे.