Sat, Feb 29, 2020 17:36होमपेज › Kolhapur › ‘प्राधिकरण’साठी जागेची पाहणी 

‘प्राधिकरण’साठी जागेची पाहणी 

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:03AMकोल्हापूर : विकास कांबळे

शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या सुनियोजित विकासासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणासाठी आयआरबीच्या वतीने टेंबलाईवाडी येथे बांधलेली प्रशस्त इमारत ताब्यात घेण्याकरिता हालचाली सुरू आहेत. या इमारतीची पाहणी देखील करण्यात आल्याचे समजते.

शहरांतर्गत खासगीकरणातून पहिलाच रस्ते प्रकल्प कोल्हापुरात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध सुरू होता. त्याकडे दुर्लक्ष करत या प्रकल्पाचे काम सुरूच ठेवण्यात आले. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर मात्र या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू झाला आणि त्यातूनच टोल हटावचे आंदोलन उदयास आले. प्रकल्पासाठी महापालिका आणि आयआरबी यांच्यात करार करण्यात आला, त्यात शहरातील टेंबलाईवाडी  येथे टिंबर मार्केटसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेपैकी साधारण तीन एकर जागा देण्याचे मान्य केले होते. या जागेवर आयआरबी कंपनीची संलग्न असलेली आयर्न हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या वतीने याठिकाणी हॉटेल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे काम सुरू करण्यात आले.

हे  काम देखील पूर्णत्वाच्या अवस्थेत असतानाच आंदोलकांनी ही जागा शासनाने ताब्यात घ्यावी म्हणून मागणी केली. येथील कामगारांना अक्षरश: पळवून लावण्यात आले. त्यामुळे कंपनीला येथील बांधकाम बंद करावे लागले. आयआरबीने कोल्हापुरातील गाशा गुंडाळल्यानंतर ही जागा शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. तसे पत्र संबंधित कंपनीला देण्यात आले. त्यामुळे साधारण वर्षभरापूर्वी कंपनीने येथील आपले सर्व साहित्य हलविले आहे. त्यानंतर या इमारतीत शासकीय कार्यालय सुरू करण्याची मागणी पुढे आली. त्यादृष्टीने शासकीय पातळीवर चर्चा सुरू होती. सध्या प्राधिकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तात्पुरती व्यवस्था

तात्पुरती व्यवस्था कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये एका बाजूला करण्यात आली आहे. प्राधिकरणचे स्वतंत्र कार्यालय करण्यात येणार असून त्यासाठी टेंबलाईवाडी येथील आयआरबीने हॉटेलसाठी बांधलेल्या इमारतीकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. सध्या ही इमारत पडूनच आहे. साधारणपणे 50 हजार चौरस फुटांच्यावर बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीत प्राधिकरणचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.