Wed, Jul 08, 2020 17:34होमपेज › Kolhapur › मित्राच्या मृत्यूने महाराष्ट्र हायस्कूलच्या 1994-95 च्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले

कर्तव्य भावनेतून २३ वर्षांनंतर अवघे एकवटले

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 17 2018 11:46PMकोल्हापूर : सागर यादव 

सहकारी वर्गमित्राच्या अपघाती मृत्यूने निराधार बनलेल्या त्याच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी काही मित्र एकत्र आले. बघता-बघता अवघा वर्ग एकवटला.  एका तुकडीतील सहकार्‍याच्या मदतीसाठी इतर तुकड्याही धावल्या. ‘अ, ब, क, ड, इ, फ’ अशा सहाही तुकड्या एकत्र आल्या. अवघ्या आठवड्याभरात त्यांनी यथाशक्ती आर्थिक मदत जमवून ती मित्राच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केली. काहींनी वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या शिक्षणाची तर काहींनी नव्याने जन्माला येणार्‍या मुलाच्या औषधोपचाराची जबाबदारी उचलली. अशा कर्तव्य भावनेने एकत्रित आलेल्या मित्रांनी सामाजिक जाणिवेतून ही एकी कायम ठेवण्याचा निर्धार केला आणि यासाठी आयोजित माजी विद्यार्थी मेळावा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. 

शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित महाराष्ट्र हायस्कूलच्या सन 1994-95 च्या इयत्ता दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मेळाव्यास उत्सफूर्तपणे उपस्थिती लावून भविष्यात हा सामाजिक वारसा अखंड राखण्याचा निर्धार केला. सामाजातील वंचितांना मदत, पर्यावरणाचे जतन, सामाजिक-शैक्षणिक कार्यात सहभागी हो न यथाशक्ती सहकार्‍याची भूमिका घेणार्‍या या माजी विद्यार्थ्यांनी एक नवा आदर्शच भावी पिढीसमोर निर्माण केला. इतकेच नव्हे तर सोशल मीडियातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ चा योग्य आणि चांगला वापर कसा होऊ शकतो याचे उदाहरण महाराष्ट्र हायस्कूलच्या सन 1994-95 च्या माजी विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे. या बॅचची संख्या 371 इतकी होती. यापैकी 317 विद्यार्थ्यांनी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 
23 वर्षांनी पुन्हा त्याच वर्गात...
मेळाव्यासाठी सर्वदूर विखुरलेले विद्यार्थी एकत्रित आले होते. काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोकरी-व्यवसायासाठी परदेशात असल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना वर्गमित्रांपर्यंत आवर्जून पोहोचविल्या. मेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी एकसारखी वेशभूषा (युनिफॉर्म) केल्याने पाहताक्षणीच शिस्त दिसत होती. प्रारंभी सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात गेले. तेथे त्यांची हजेरी घेण्यात आली. यानंतर एकमेकांशी भेटीगाठी झाल्यानंतर शाळेची घंटा वाजली, सर्वजण मैदानावर गेले.   यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे चेअरमन डी.बी. पाटील, माजी शिक्षक आर.डी. आतकिरे, एम. टी. पाटील, शिवछत्रपती पुरस्कारविजेते आर.डी. पाटील, मुख्याध्यापक  रामाणे आदी आजी-माजी शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. मेळाव्याच्या निमीत्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेली आठवणीतील दिवस ही विशेष चित्रफित दाखविण्यात आली. यानंतर या बॅचच्या  विद्यार्थ्यांची माहिती देणार्‍या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित छायाचित्र उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांच्या संग्रही भेट म्हणून देत नेटक्या संयोजकाचीही भूमिका विद्यार्थ्यांनी बजावली.