Mon, Sep 21, 2020 23:21होमपेज › Kolhapur › विद्यार्थी आत्महत्येचे संकट गंभीर!

विद्यार्थी आत्महत्येचे संकट गंभीर!

Last Updated: Jan 15 2020 1:44AM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या गंभीर समस्येने भारतीय अर्थकारण आणि राजकारणाला हेलावून सोडले असताना भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 2018 मध्ये देशात प्रत्येक 24 तासाला 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपविले असून गेल्या दशकामध्ये सुमारे 82 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरो या भारतातील गुन्हेगारीविषयक तपशीलवार माहिती आणि त्याचे विश्‍लेषण करणार्‍या राष्ट्रीय संस्थेने नुकतीच आकडेवारी प्रसिद्ध केली. यामध्ये 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2018 या 10 वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीचा वेध घेतला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आत्महत्येचे प्रमाण एकूण आकडेवारीच्या 57 टक्के इतके आहे. 2018 सालात तब्बल 10 हजार 159 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. यात देशात महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपाठोपाठ पुरोगामी, उद्यमशील अशी ओळख असणार्‍या महाराष्ट्राच्या कपाळावर विद्यार्थी आत्महत्येचा दुसरा कलंक लागू पाहतो आहे. 

‘ड्रग्ज टू डिप्रेशन’ असे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रवासाचे वर्णन काही मनोविश्‍लेषकांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बदलती जीवनशैली, पर्यावरण, जैविक बदल आणि सामाजिक व मानसिक स्थित्यंतरे ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. तरुणांमध्ये तणाव सहन करण्याची क्षमता कमी होत आहे. या क्षमतेच्या अभावाने तरुण नैराश्येत गुरफटतो आणि नंतर आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपविता. त्यामुळे मनोबल ओवाढविण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे नव्या काळापुढील आव्हान असेल. 

10 टक्के आत्महत्या बेरोजगारीमुळे

भारतात 2018 सालामध्ये एकूण 1 लाख 30 हजार जणांनी आत्महत्या केली. यात  विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण 8 टक्के इतके आहे. नैराश्य, आर्थिक दारिद्य्र, व्यसनाधीनता, मानसिक असंतुलन, परीक्षेतील अपयश आणि कौटुंबिक कलह अशी यामागची कारणे आहेत. याशिवाय बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 10 टक्के इतकी आहे.

2018 मध्ये महाराष्ट्रात 1448 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरोच्या अहवालानुसार केवळ 2018 च्या आकडेवारीचा वेध घेतला तर 1448 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद झालेल्या महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ तामिळनाडू (953), मध्य प्रदेश (862), कर्नाटक (755) आणि पश्‍चिम बंगाल (609) या पाच राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये एका वर्षात 4 हजार 627 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचे एकूण त्या वर्षातील आत्महत्यांच्या देशातील संख्येच्या 45 टक्के इतका वाटा आहे. 

 "