Sat, Feb 29, 2020 12:10होमपेज › Kolhapur › विद्यार्थी अपघात विमा योजना फोल?

विद्यार्थी अपघात विमा योजना फोल?

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 15 2017 11:43PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : नसिम सनदी 

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा कवच म्हणून सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी अपघात विमा योजना किचकट नियमांमुळे फोल ठरली आहे. मृत अथवा एखाद दुसरा अवयव निकामी झाला तरच या योजनेचा लाभ मिळतो. त्यातून उपचार वगळल्यामुळे शालेय वेळेत झालेल्या दुखापतींच्या वैद्यकीय खर्चाचा भुर्दंड  पालकांनाच सोसावा लागतो. उपचाराची तरतूदच नसल्याने जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक दोन्हीही शिक्षण विभागही जबाबदारी झटकतात. चंदगडमधील विजया निवृत्ती चौगले या शाळकरी मुलीवर बेतलेल्या प्रसंगानंतर उपचाराच्या खर्चाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

पालकमंत्र्यांनी उपचाराच्या खर्चाचा भार उचलण्याची तयारी दर्शवल्याने  चौगले कुटुंबीयांसाठी काहीअंशी दिलासा मिळाला  असला तरी एकूणच अशाप्रकारे जर शाळेतच असताना दुखापत झाली तर काय? याचे उत्तर कोणाकडेही नाही. 

शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना चालवली जात असताना पुन्हा याचना करायची वेळ का यावी, याबाबतीत जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता, या योजनेतून उपचाराची तरतूद 2013 मध्ये शासनानेच वगळली असल्याचे सांगण्यात आले. पहिली ते बारावीपर्यंत मुलांसाठी राजीव गांधी यांच्या नावाने चालवल्या जाणार्‍या या योजनेतून उपचाराचा खर्च देण्याची तरतूद होती, पण त्याचा गैरवापर होत असल्याने वगळण्यात आल्याचे शासनाने स्पष्टीकरण दिले.  

चंदगडमधील विजया चौगले ही  शाळेत मुख्याध्यापिकांनीच दिलेल्या शिक्षेमुळे जखमी झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तिच्यावरील उपचाराचा भार तिच्या कुटुंबीयांवरच आहे. चंदगडमधीलच शिनोळी येथील विक्रम पाटील या मुलाची कथाही अशीच आहे. विक्रम हा कुस्तीपटू म्हणून जिल्हा परिषदेकडून चालवल्या जाणार्‍या निवासी क्रीडा प्रशालेत होता. प्रशालेत असतानाच गेल्यावर्षी त्याच्या हाताच्या खुब्याला दुखापत झाली. त्याच्यावर उपचारासाठी कुटुंबीयांकडून 35 हजारांचा खर्च झाला. हा खर्च मिळावा अशी मागणी कुटुुंबियांनी जि.प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे अर्जाद्वारे केली. पण गेले वर्षभर टोलवल्यानंतर अशाप्रकारे उपचाराची तरतूद नसल्याचे नुकतेच त्यांना सांगण्यात आले आहे. 

विमा कंपनीऐवजी जिल्हास्तरीय समितीकडून निवड

या अपघात योजनेत तीन टप्पे करुन त्याप्रमाणे मदत दिली जाते. अपघाती मृत्यू झाल्यास (रस्ते अपघात, विजेचा शॉक, पाण्यात बुडून) 75 हजार रुपये,  हातपाय व डोळे यापैकी एक अवयव कायमस्वरुपी निकामी झाल्यास 30 हजार रुपये आणि हातपाय किंवा डोळे यापैकी दोन अवयव निकामी झाल्यास 50 हजार रुपये असा मदत निधी निश्‍चित करण्यात आली. विमा कंपनीऐवजी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य व शिक्षणाधिकारी सचिव असलेल्या या शासकीय कमिटीकडे लाभार्थी निवडीचे अधिकार देण्यात आले. 

2010 पासून एकालाही मदत नाही

या योजनेतंर्गत लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील 32 जणांचे अर्ज 2010 सालापासून जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. विम्याचा निधी शिक्षण संचालनालयाकडून दिला जातो, पण तो अद्याप दिलेला नसल्याने गेल्या 7 वर्षात एकाही विद्यार्थ्याला लाभ देता आलेला नाही.विशेष म्हणजे 32 पैकी 31 जण मृत झालेले आहेत. त्यांना 75 हजार रुपयाप्रमाणे 2 कोटी 32 लाख 5 हजार रुपये देणे अपेक्षित आहे. जयसिंगपूरचा एक विद्यार्थी तर 2010 पासून बेडवर आहे. शाळेत असताना त्याला अपघात झाला आहे. त्याच्या मेंदूला मार लागला होता. त्याला जि.प कडून 50 हजार रुपये मंजूर झाले आहे, पण ती रक्कम अजून जमा झालेली नाही. यावर्षीसाठीचे 6 प्रस्ताव जि.प.कडे आले आहेत, पण त्याचीही अद्याप पुर्तता झालेली नाही.