Wed, Aug 12, 2020 09:16होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू

शिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 06 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत येत्या काही दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी जुन्या पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी दिला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमवेत सोमवारी होणार्‍या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास प्रशासनाला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असाही निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम रखडल्याने त्याबाबत महापौर स्वाती यवलुजे, निमंत्रक आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालील  सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

समितीचे निमंत्रक आर. के.पोवार म्हणाले की, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 13 निष्पाप जीवांचे बळी जाऊन शासनस्तरावर कोणतीच हालचाल दिसून येत नाही. जुन्या शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर झाले आहे. आणखी किती जणांच्या मृत्यूची राज्यशासन वाट पहात आहे, पर्यायी पुलाचे अवघे 15 टक्के बांधकाम रखडले आहे. येत्या काही दिवसांत शासनस्तरावर ठोस पावले न उचलल्यास कोणत्याही क्षणी जुन्या पुलावर भिंत उभारून वाहतूक बंद करण्यात येईल, पुलाला जोडणारा 
रस्ता उकरण्यात येईल.

बाबा पार्टे म्हणाले, पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत लोकभावना अत्यंत तीव्र आहेत. जानेवारीत 13 निष्पाप जीवांचे बळी जावूनही प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत नाही. कोल्हापूरच्या अस्तित्वाची ताकद दाखवून देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर म्हणाले, प्रश्‍न कोणताही असो, कोल्हापूरकरांवर अन्याय करण्याचे राजकारण्यांचे धोरण आहे. जुना पूल धोकादायक असतानाही  पर्यायी पुलाबाबत सकारात्मक निर्णय होत नाही. भविष्यात एखादी भीषण दुर्घटना घडल्यास जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर मनुष्यबधाचे गुन्हे दाखल करण्याबाबत कृती समितीने ठोस निर्णय घ्यावा.
यावेळी झालेल्या चर्चेत जयकुमार शिंदे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, प्रसाद जाधव, किशोर घाटगे, अशोक पवार, वसंतराव मुळीक, किसन कल्याणकर, श्रीकांत भोसले, नगरसेविका सुरेखा शहा, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, नगरसेविका वनिता देठे, रमेश मोरे, अशोक जाधव, माजी जि. प. सदस्य एस. आर. पाटील, संजय माने, चंद्रकांत बराले, जहिदा मुजावर, अजित सासणे आदींनी भाग घेतला.

जुना पूल वाहतुकीला धोकादायक

पोलिस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी पोलिस दलासह जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत शासनस्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे. जुना पूल वाहतुकीला धोकादायक ठरल्याचा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. या मार्गावरील अवजड वाहतूकही अन्यत्र मार्गावरून वळविण्यात आली आहे. राजाराम बंधार्‍यावरील वाहतूकही धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यापूर्वी  पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

आर या पारची लढाई करावी लागेल...

शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या पुलाच्या कामासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. ‘आर या पार’च्या लढाईशिवाय पर्याय राहिला नाही. टोल वसुली नाके हद्दपार करणार्‍या कार्यकर्त्यांना पुलासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असेही समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.