Tue, Jul 07, 2020 23:40होमपेज › Kolhapur › उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ

उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ

Published On: Mar 28 2019 1:38AM | Last Updated: Mar 28 2019 1:11AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (47) व हातकणंगले मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना आजपासून जारी करण्यात आली. गुरुवारपासून (दि. 28) 4 एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांना 
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी, कार्यालयाकडून स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान, अर्ज दाखल करताना उमेदवारांना मिरवणुकीने येता येणार नसून शक्‍तिप्रदर्शनावर निर्बंध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
देसाई म्हणाले, निवडणूक लढवणार्‍या एका उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र भरता येतील. ज्या उमेदवारांनी  प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दाखल व प्रलंबित किंवा शाबित असलेल्या फौजदारी गुन्ह्याचा समावेश केलेला आहे, त्यांनी विहित नमुन्यातील माहिती जास्तीत जास्त खपाच्या स्थानिक वर्तमानपत्रात तसेच दूरदर्शन वाहिन्यांवर माहितीसाठी स्वखर्चाने प्रसिद्ध करावयाची आहे. त्याचप्रमाणे ज्या राजकीय पक्षाने असे उमेदवार पुरस्कृत केले असतील, त्यांनीही त्याची विहित पद्धतीने प्रसिद्धी करावयाची आहे.  उमेदवारी अर्ज भरल्यापासून निकालापर्यंत उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये इतकी असणार आहे. उमेदवारांनी खर्चाचा हिशेब रोज ठेवावा. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षकांकडून किमान तीनवेळा केली जाणार आहे. खर्चाच्या रजिस्टरमध्ये निरीक्षकांना खर्चाचा हिशेब दाखवणे अपरिहार्य आहे. खर्च न दाखवल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार होणार आहे. यासह चुकीच्या खर्चाबाबतही कारवाई होणार आहे.  

उमेदवारांना शक्‍तिप्रदर्शनासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. तसेच वाहनांच्या ताफ्यावरही निर्बंध असणार आहेत. उमेदवारास नामनिर्देशन पत्र दाखल करावयास येताना, जिल्हाधिकारी कार्यालयापासून 100 मीटर परिसरात उमेदवारासह जास्तीत जास्त पाच व्यक्‍तींना सोबत आणता येईल. तसेच तीनपेक्षा जास्त वाहने 100 मीटर परिसरात आणता येणार नाहीत.  
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर देसाई यांनी सांगितले की, उमेदवारांना लोकांकडून निधी जमा करता येतो; पण त्याचा हिशेब द्यावा लागणार आहे. 

पत्रकार परिषदेस निवडणूक निर्णय अधिकारी  नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सतीश धुमाळ आदी उपस्थित होते. 

मतदान केंद्रांची संख्या
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 2132 मतदान केंद्रे असणार आहेत, तर वाढीव प्रस्तावित 16 आहेत. हातकणंगले मतदारसंघासाठी 1807 मतदान केंद्रे असणार आहेत; तर प्रस्तावित वाढीव 49 आहेत.
उमेदवारांच्या तपशिलाबाबत आक्षेपाची माहिती वेबसाईटवर उमेदवारांसबंधी सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवाराने चुकीची माहिती दिली किंवा उमेदवाराने माहिती लपवली असल्याचा आक्षेप जर कोणी घेतला, तर या आक्षेपाचा तपशीलसुद्धा वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

खा. शेट्टी आज अर्ज दाखल करणार
हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी गुरुवारी मिरवणुकीने आपला अर्ज भरणार आहेत. सकाळी अकरा वाजता सर्व कार्यकर्ते दसरा चौकामध्ये एकत्र जमणार आहेत. तेथून मिरवणुकीस सुरुवात होईल. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. खा. शेट्टी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. मिरवणुकीचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभेत करण्यात येणार आहे.  शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले आहे.

खा. महाडिक सोमवारी अर्ज भरणार
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खा. धनंजय महाडिक हे सोमवारी (दि. 1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शक्‍तिप्रदर्शन टाळत खा. महाडिक आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह जाऊन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले.

दहा मतदान केंद्रावर महिला प्रमुख
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी दहा मतदान केंद्राच्या प्रमुख महिला अधिकारी असणार आहेत. अशा पद्धतीने पहिल्यांदाच वेगळा उपक्रम प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.

ज्या मतदारांनी 25 मार्चपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरला आहे, अशा अर्जांची पडताळणी करून आवश्यक कागदपत्रे जोडलेल्या मतदारांची नावे चार एप्रिलनंतर मतदार यादीत समाविष्ट केली जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

 उमेदवारांच्या शक्‍तिप्रदर्शनावर निर्बंध

     उमेदवारांना 70 लाख खर्च मर्यादा
उमेदवारी अर्जासोबतची कागदपत्रे

उमेदवाराचे पाच स्टॅम्पसाईज फोटो, नामनिर्देशनपत्राची मूळ प्रत व तीन झेरॉक्स प्रती, नमुना 26 मधील परिपूर्ण माहिती भरलेले अ‍ॅफिडेव्हिट, सर्वसाधारणसाठी 25,000 रुपये अनामत रक्‍कम, अनुसूचित जाती-जमातीसाठी 12,500 अनामत रक्‍कम भरल्याची पावती आवश्यक आहे. उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते काढणे बंधनकारक आहे. 

देशात विक्रमी मतदानाची टक्केवारी
कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात या निवडणुकीत देशात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्‍त करण्यात आली. कारण यापूर्वी लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान जिल्ह्यातून झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी तसेच मतदान यंत्र जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.