Thu, Sep 24, 2020 11:26होमपेज › Kolhapur › गुळाला हमीभाव मिळण्यासाठी चर्चेला प्रारंभ

गुळाला हमीभाव मिळण्यासाठी चर्चेला प्रारंभ

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:18AMकोल्हापूर : डी.बी.चव्हाण

गुळाला हमीभाव मिळावा, यासाठी गेली अनेक वर्षे शेतकर्‍यांकडून मागणी होत आहे. पण सरकार उपपदार्थ म्हणून गुळाची गणना करून हा मुद्दा सातत्याने मागे पडत आला आहे. पण कृषिमूल्य आयोगाने हा विषय आता चर्चेसाठी घेतला आहे. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.6) येथील कृषी महाविद्यालयात बैठक होत आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून बैठकीला गुळ उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना प्रतिनिधी, अडते, व्यापारी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

गूळ उत्पादन हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. शेतकरीही निष्ठेने हा व्यवसाय करतात. त्याशिवाय गुळाची चव, रंग आणि गोडी अप्रितम आहे. यामुळे कोल्हापूरचा गूळ जगप्रसिद्ध आहे. पण गूळ हमीभावाच्या कक्षेत कधी आलाच नाही. साखरेच्या भावावर आधारित गुळाला भाव ठरवता जातो, त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा गुळाला फारच कमी दर मिळत आहे. त्यामुळे गुळाला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी सातत्याने मागणी करत आहे. 

गुळाला हमीभाव मिळावा, या विषयावर कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीने यापूर्वी तीन ते चार वेळा मुंबईमध्ये मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करून गूळ उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण सरकारकडून गुळाची गणना प्रक्रिया केलेला पदार्थ अशी केली आहे. त्यामुळे हमीभावाचा प्रश्‍न मागे पडत आहे. परंतु, बाजार समितीच्यावतीने गूळ उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी व हमीभाव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न ठेवले आहेत. शासनाकडे सातत्याने पाठपुरवा केला जात आहे, त्यासाठी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याकडून सहकार्य लाभत आहे. या बैठकीत शेतकरी संघटना, अडते, व्यापारी, शेतकरी यांची मते जाणून घेण्यात येणार आहे.  येथील प्रादेशिक ऊस व गूळ उत्पादन केंद्रांच्या वतीने या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. 

बैठकीत या विषयावर होणार चर्चा

गूळ उत्पादन करण्यासाठी लागणार्‍या बाबींचा बाबनिहाय खर्चाची  आवश्यकता. 

प्रतिक्‍विंटल उसापासून गुळाचे उत्पादन किती होते, त्यावर चर्चा करणे .

गूळ तयार करण्यासाठी विकसित केलेले ऊस वाणाचे संशोधन.

गुळाचे उपपदार्थ .

गुळाचा औद्योगिक वापर, गूळ व साखर यांची तुलनात्मक उपयोगिता. 

गूळ वापराचे फायदे.