Fri, Sep 25, 2020 14:49होमपेज › Kolhapur › ‘पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल’ला थाटात प्रारंभ

‘पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल’ला थाटात प्रारंभ

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 1:15AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

खमंग, रुचकर व लज्जतदार पदार्थांची चव चाखण्याबरोबरच मनसोक्‍त खरेदीसाठी उत्सुक असलेल्या कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली. दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ.एम. तर्फे आयोजित ‘पुढारी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल’ला शुक्रवापासून शानदार प्रारंभ झाला. कोल्हापूरकरांसाठी जे जे हवं ते सारं काही एकाच छताखाली आणि सहज उपलब्ध झाल्याने प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी तुडुंब गर्दी झाली.

झी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील हार्दिक जोशी (राणा) व अक्षया देवधर (अंजली) यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. यावेळी दै. ‘पुढारी’ टोमॅटो एफ. एम. च्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी योगेश जाधव, रॉनिक वॉटर हिटर सिस्टीमचे तानाजी पवार, पितांबरी रुचीयानाचे संतोष वालुगडे, सौ. शांतादेवी डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांनी स्टॉल्सना भेटी देऊन माहिती घेतली.

यानंतर सौ. स्मितादेवी जाधव यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क येथे 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला राहणार आहे. दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ. एम. आयोजित ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’साठी रॉनिक वॉटर हिटर सिस्टीम आणि पितांबरी रुचीयाना हे सहप्रायोजक आहेत. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर हा फेस्टिव्हल कोल्हापूरकरांसाठी पर्वणी ठरला आहे. 

ऑफर्सची बरसात...

प्रदर्शनात व्यावसायिक व खाद्याचे शंभरहून अधिक स्वतंत्र स्टॉल आहेत.  गॅस शेगडी, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमेटिशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्यांचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, पिकनिक टेबल, सार्थ आयुर्वेदिक, सरस्वती चहा, विकिंज, लहान  होम रिव्हाईज आदी वस्तूंच्या स्टॉलवर आकर्षक ऑफर्स आहेत.  

विविध राज्य, प्रांतातील खाद्य 

फेस्टिव्हलमध्ये विविध राज्य, प्रांतातील खाद्यसंस्कृती ऐकवटली आहे. तांबडा-पांढरा रस्सा, वडा कोंबडा, कबाब, किचन, लॉलीपॉप, तंदूर, हैदराबादी, लखनवी बिर्याणी या पदार्थांची रेलचेल आहे. शाकाहारीमध्ये डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, पप्स, चीज, व्हेज पुलाव, सोलकढी, आईस्क्रिम आदी चमचमीत पदार्थांचे स्टॉलही आहेत. ऑटोमेटिक मशीनवरील डोसा, स्मोक बिस्कीट आकर्षण ठरत आहेत.

नाताळ सणाचे आकर्षण

‘पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल’मध्येही प्रवेशद्वाराजवळच नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेला ख्रिसमस ट्री,  सांताक्‍लॉज  ही थीम साकारली आहे. प्रवेशद्वार प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

राणाच्या ‘चालतंय की’ला टाळ्या, शिट्ट्यांची दाद

राणा  व अंजली  यांचे आगमन होताच तरुणाईमध्ये एकच जल्‍लोष सुरू झाला.  मोबाईलवरून त्यांची छबी टिपण्यासाठी, सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठीही धडपड सुरू होती. लहान मुले तर राणादा, राणादा म्हणून हाक मारत होते. उद्घाटनानंतर दोघांनी चाहत्यांशी मनसोक्‍त गप्पा मारल्या. सुरुवातीलाच ‘चालतंय की’, हा डायलॉग हार्दिक जोशी यांनी उच्चारताच उपस्थितांनी त्याला शिट्ट्या आणि टाळ्यांनी दाद दिली. मी एका वर्षातच कोल्हापूरचा झालो असल्याची कबुलीही त्याने दिली. अक्षया देवधर म्हणाल्या, कोल्हापूरची माणसे खूपच प्रेमळ आहेत. माणुसकी जपलेले शहर म्हणजे कोल्हापूर असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. दोघांनी मालिकेतील विविध गंमतीदार किस्से सांगून उखानाही घेतला. 

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल’ला प्रत्येकांनी भेट देऊन भरगच्च शॉपिंग करण्याचे आवाहन राणा आणि अंजली यांनी केले.