Fri, Jul 03, 2020 01:07होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी 

Last Updated: May 31 2020 10:15PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे 45 रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 607 वर गेली आहे. दोघेजण कोरोनामुक्‍त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज घेतलेल्यांची संख्या 134 वर गेली आहे. कडवेपैकी लाळेवाडी (ता. शाहूवाडी) येथील 55 वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला होता, तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या सहा झाली आहे. उपचार घेत असलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेल्याने सीपीआर प्रशासन हादरून गेले आहे. लाळेवाडी येथील ही महिला मुंबईहून आली होती. तिला इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन करण्यात येणार होते. मात्र, तिच्या पतीने घरी स्वतंत्र व्यवस्था 
आहे, असे सांगतिल्याने तिला होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. दि. 25 रोजी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान, तिला जुलाबाचा त्रास वाढल्याने दि. 27 रोजी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी (दि. 30) दुपारी तिचा मृत्यू झाला. आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
आज दुपारपर्यंत 28 पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यात कागलमध्ये आज आणखी 11 नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कागलमधील बाधितांची संख्या 51 वर गेली. अवचितवाडी येथे आढळलेल्या नव्या सात रुग्णांचा त्यात समावेश आहे.  58 वर्षांच्या वृद्धेसह 46, 26 व 21 वर्षीय महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 21 वर्षीय तरुणासह 42 व 40 वर्षीय महिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पिंपळगावमध्येही आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 59 वर्षीय वृद्धासह 24 आणि 32 वर्षीय महिलांचा समावेश आहे. रात्री आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला.

गडहिंग्लज तालुक्यात आज आणखी 6 रुग्णांची भर पडली. शेंद्रीमाळ येथील 52 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हरळी येथील 49 वर्षांच्या पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचे आज अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर स्पष्ट झाले. उंबरवाडी येथील 25 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुनवाडी येथील 28 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गिजवणे येथील 16 वर्षीय युवकासह 43 वर्षीय पुरुषही कोरोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले.

भुदरगड तालुक्यातही आज आणखी पाच नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये करडवाडी येथील 32 वर्षीय पुरुषाला, दोनवडे येथील 36 वर्षीय पुरुषाला लागण झाली आहे. त्यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. धुरेवाडी (पाटगाव) येथील 20 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. शिवडाव येथील 34 वर्षीय महिलेचा तसेच पाळ्याचाहुडा येथील 39 वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजरा तालुक्यातही बाधितांची संख्या 50 वर गेली. दुपारी आणखी चार रुग्णांची भर पडली. शृंगारवाडीतील 53 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देवर्डे येथील 33 वर्षीय पुरुष तसेच 30 वर्षीय महिलाही कोरोनाग्रस्त असल्याचे आज स्पष्ट झाले. बेलेवाडीत 37 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाल्याचे आज प्राप्‍त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. रात्री आणखी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

शाहूवाडी तालुक्यातही आज तीन नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये मृत महिलेच्या अहवालाचाही समावेश आहे. कुंभवडे येथील 33 वर्षीय पुरुष आणि मरळे येथील 44 वर्षीय पुरुषाचाही अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

रात्री दहा वाजता आणखी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये चंदगड तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आजर्‍यात आणखी पाच रुग्ण आढळून आले. शाहूवाडीतही सहा नव्या रुग्णांची भर पडली. भुदरगड, राधानगरी आणि कागल येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. या 17 जणांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक रुग्णाच्या पॉझिटिव्ह अहवालाचा समावेश आहे.