Fri, Sep 18, 2020 18:36होमपेज › Kolhapur › आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता प्रकल्पात शिवाजी विद्यापीठ

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता प्रकल्पात शिवाजी विद्यापीठ

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 1:07AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

भारतीय उच्चशिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या द‍ृष्टीने भारताने युरोपियन युनियन या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता क्षेत्रातील मान्यताप्राप्‍त संस्थेसमवेत संयुक्‍त सहकार्य प्रकल्प हाती घेतला आहे. भारतातर्फे नॅक (बंगळूर) त्याचे समन्वयक म्हणून काम पहात आहे. त्याचप्रमाणे भारतातर्फे निवडण्यात आलेल्या आठ भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये  शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला असल्याची घोषणा ‘नॅक’चे  सल्‍लागार तसेच या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. जगन्‍नाथ पाटील यांनी शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात पत्रकार परिषदेत केली.  विद्यापीठास ग्रामीण शिक्षणक्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली असल्याचे प्रशंसोद‍्गार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी यावेळी काढले. 

डॉ.  पाटील म्हणाले,  युरोपियन युनियनच्या ‘इरॅस्मस प्लस’ या उपक्रमांतर्गत युरोपियन युनियन आणि भारत यांच्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी संवादाचा पूल निर्माण करण्यासाठी संयुक्‍त प्रकल्प हाती घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, भारतातर्फे नॅकने आणि युनियनतर्फे स्पेनच्या बार्सिलोना विद्यापीठाने समन्वयक संस्था म्हणून काम पहावयाचे ठरले. सुमारे एक दशलक्ष युरो किमतीच्या या त्रैवार्षिक प्रकल्पात युरोपियन युनियनमधील तसेच भरतातील निवडक नामवंत विद्यापीठांचा समावेश करण्यात आला असून, त्या आठ विद्यापीठांत  शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला. या निवडीमागे शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. नॅकने आपल्या राष्ट्रीय अहवालात मार्गदर्शक उपक्रम म्हणून याची नोंद घेतलेली आहे. शिवाजी विद्यापीठाने देशातील प्रादेशिक विद्यापीठांचा डाटा संकलित करणे अभिप्रेत आहे, असे त्यांनी सांगितले. 

निवडीबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने भारतात होणार्‍या पुढील बैठकीचे यजमानपद भूषविण्याची संधी शिवाजी विद्यापीठाला प्राप्‍त झाल्याची माहितीही दिली. 

पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले आदी उपस्थित होते.