Fri, Jul 10, 2020 03:10होमपेज › Kolhapur › शिवशाहिरांच्या पोवाड्यांनी रायगड जागणार

शिवशाहिरांच्या पोवाड्यांनी रायगड जागणार

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 12:21AM
कोल्हापूर : सागर यादव 

‘रायगडावर मेघरवांनी झडल्या या नौबती, जाहले शिवबा छत्रपती... सह्याद्रीचे काळे कातळ, गर्जत उठले बारा मावळ, या आनंदा उपमा केवळ याच आनंदाप्रती... जाहले शिवबा छत्रपती...’,  

या व अशा स्फूर्तीदायी शिवराज्याभिषेक गीतांचे सादरीकरण राज्यभरातील शिवशाहीर करणार आहेत. 6 जून रोजी रायगडावरील राजदरबारात डफ-तुणतुणे आणि सुरकर्‍यांच्या साथीत मराठमोळ्या शिवशाहिरांच्या स्फूर्तीदायी गीतांनी शिवभक्‍तांत नवचैतन्य निर्माण करणार आहेत. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने रायगडावर प्रतिवर्षीप्रमाणे 5 व 6 जून या कालावधीत विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र व सार्वभौम स्वराज्याचा सर्वोच्च क्षण म्हणूून राजधानी रायगडावरील ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याला इतिहासात विशेष महत्त्व आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून प्रेरणादायी शिवकाळाचा इतिहास नव्या पिढीसमोर उभा करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य शिवशाहीर व त्यांची पथके करत आहेत. कोणत्याही मानधनाची, मानापमानाची अपेक्षा न करता गेल्या अनेक वर्षांपासून शिवशाहिरांची पथके रायगडावर उपस्थित असतात.    

‘आज संपली भयाण रात्र, या भूमीला लाभले छत्र, जिजाऊंचे आतूर नेत्र पाहण्या शिवमहिपती...जाहले शिवबा छत्रपती. स्वाभिमानी हा मराठबाणा, कधी न झुकल्या उन्‍नत माना, देव, राष्ट्र अन् धर्मरक्षणा देती पूर्णाहुती... जाहले शिवबा छत्रपती. कोटी जनांनी केले समर्पण, त्या रुधिराचे व्यर्थ न सिंचन, बलिदानातून त्या आश्‍वासन सार्वभौम शाश्‍वती... 

जाहले शिवबा छत्रपती,’ अशा कवणांची निर्मिती शिवशाहिरांकडून करण्यात आली आहे. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी (कोल्हापूर), शिवशाहीर रंगराव पाटील (महे, ता. करवीर), शाहीर राजेंद्र कांबळे (औरंगाबाद), शाहीर सुरेश जाधव, शाहीर बाळासाहेब भगत, शाहीर विजय तनपुरे आदी पथके आपल्या शाहिरीने हा सोहळा अविस्मरणीय करणार आहेत. या शिवशाहिरांचा विशेष गौरव खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मानपत्र व स्मृतिचिन्हाने होणार आहे.

शिवराज्याभिषेक गीत...

‘विश्‍वमंडपी भरतभूमीचा, विश्‍वपुरुष वंदीला...जय जय छत्रपती बोला... बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. सेतू काश्मीर कच्छ कामरूप दरबार भरला, महाद्वार दिल्‍लीका हिमालय भालदार बनला, निगाहो रखो पुकारता नृप सभांगणी कमिला चांदण्या उधळीत गगनफुला जय जय छत्रपती बोला...’ असे कवण मुंबई येथील शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी केले असून याचे सादरीकरण सर्व शाहीर एकाचवेळी करणार आहेत.