Tue, Jan 19, 2021 22:32होमपेज › Kolhapur › शिवसेना महाविकास आघाडीसोबत; ठराव जमा करताना मात्र सवतासुभा

शिवसेना महाविकास आघाडीसोबत; ठराव जमा करताना मात्र सवतासुभा

Last Updated: Jan 22 2020 12:32AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा  

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढविण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणार आहेत. शिवसेना महविकास आघाडीसोबत असली, तरी ठराव जमा करताना मात्र सवतासुभा मांडला आहे. खा. संजय मंडलिक यांनी 100, तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी 150 ठराव मंगळवारी स्वतंत्ररीत्या सहायक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात जमा केले.

‘गोकुळ’च्या राजकारणात खा. संजय मंडलिक आणि करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोधी गटाला साथ दिली आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता हाच प्रयोग ‘गोकुळ’च्या निवडणुकीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेस एकसंध होती.

मात्र, ‘गोकुळ’च्या राजकारणात काँग्रेसचा एक गट सत्ताधारी आघाडीसोबत आहे, तर दुसरा गट विरोधी आघाडीची बाजू सांभाळत आहे. ‘गोकुळ’च्या निमित्ताने पक्षीय परिघाबाहेर युती आणि आघाड्या होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निर्णयावरच ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, विद्यमान संचालक अरुण डोंगळे आणि विश्‍वास पाटील यांनी स्वतंत्रपणे ठराव जमा केले.

या पार्श्‍वभूमीवर खा. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीसोबत असल्याचे जाहीर केले असले, तरी स्वतंत्ररीत्या 100 ठराव सहायक दुग्ध निबंधक कार्यालयात जमा केले. चंद्रदीप नरके यांनी 150 ठराव जमा केले. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे 265, माजी आमदार सत्यजित पाटील यांचे 202, संग्राम कुपेकर यांचे 125 आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्याकडील 25 असे एकूण 732 ठराव असल्याचे संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले आहे.