Wed, Jan 27, 2021 08:21



होमपेज › Kolhapur › शास्त्रीनगर-यादवनगरात तरुणांत धुमश्‍चक्री

शास्त्रीनगर-यादवनगरात तरुणांत धुमश्‍चक्री

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:59AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी 

शास्त्रीनगर व यादवनगरातील तरुणांच्या दोन गटांत मंगळवारी मध्यरात्री धुमश्‍चक्री उडाली. गेले पंधरा दिवस या परिसरात दोन गटांतील वाद धुमसत होता. मध्यरात्री तलवारी, कोयते, काठ्या घेऊन या गटांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन्ही गटांतील पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तोडफोडीत नागरिकांच्या 15 ते 20 वाहनांची नाहक तोडफोड करण्यात आली. 

या परिसरात राहणारे अभिजित सावंत आणि संकेत मुरकुटे यांच्यात मुलीच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. दोघांनी साथीदारांसोबत एकमेकांच्या गल्‍लीत जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता. मंगळवारी मध्यरात्री दोन्ही गटांतील वाद उफाळून आला. अभिजित सावंत आणि मुरकुटे यांनी साथीदारांच्या मदतीने तलवारी, कोयते, काठ्या घेऊन वाहनांची तोडफोड केली. सात मोटारी, पाच दुचाकी आणि दोन रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच येथील घरांवरही दगडफेक करण्यात आली आहे. 

याप्रकरणी संकेत शिवाजी मुरकुटे, मुजबील कुरणे, शकील मुजावर, सद्दाम सत्तार मुल्‍ला, योगेेश कारगावे, इमाम हुसेन कुरणे, नावेद यांच्यासह दोघांवर, तर दुसर्‍या गटातील अभिजित सावंत, सनी सावंत, अवधूत सोमवंशी, अजिंक्य आरगे, रवी यादव यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

गेले पंधरा दिवस या परिसरात दोन गटांतील वाद सुरू आहे. रात्री अपरात्री दगडफेकीचे प्रकार घडत असल्याने नागरिक प्रचंड दहशतीमध्ये आहेत. महिलांनाही रात्री आठनंतर परिसरात वावरणे मुश्किल बनल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. 

नाहक भुर्दंड

तरुणांतील या वादातून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना याचा फटका बसला आहे. घराच्या दारात उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड झाल्याचे बुधवारी सकाळी नागरिकांना समजले. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून वाहनांवरही दगडफेक झाल्याने मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.