Sat, Feb 29, 2020 11:52होमपेज › Kolhapur › खा. शरद पवारांची ‘पॉवर’ ठरली कुचकामी 

खा. शरद पवारांची ‘पॉवर’ ठरली कुचकामी 

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 26 2019 12:32AM
कोल्हापूर : विजय पाटील 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. देशाच्या राजकारणात त्यांचा भितीयुक्‍त दबदबा आहे. पक्षाचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत खासदार असतानाही त्यांच्या तिरक्या राजकीय चालींच्या भीतीने भले भले टरकतात; पण कोल्हापूर जिल्हा मात्र खा. पवार यांच्या या ‘पॉवर’ला  प्रतिसाद देत नसल्याचे पुन्हा एकदा  दिसून आले. कारण, खा. पवार यांनी  धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांच्या विजयासाठी जंग जंग पछाडूनही त्यांच्या पदरी दारुण अपयश आले. 

कोल्हापूरच्या पंचगंगेचे पाणी भल्याभल्यांना कळणार नाही, असं महाराष्ट्रात म्हटलं जातं.  राजकारणात अत्यंत दक्ष असणारी इथली जनता आहे. त्यामुळेच येथील प्रत्येक निवडणूक  ‘स्वाभिमानी जनता’ या शब्दांवर लढवण्याची परंपरा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेच दिसून आले. खा. पवार यांचे कोल्हापूर आजोळ आहे. त्यांचा मोठा गोतावळा या परिसरात आहे. 

1999 साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर या जिल्ह्याने त्यांना राजकीय ताकद दिली. एकेकाळी तत्कालिन इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सदाशिवराव मंडलिक असे दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे होते. त्या दरम्यान कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख काही वर्षे होती. परंतू स्व. खा. सदाशिवराव मंडलिक आणि खा. पवार यांच्यातील जाहिर मतभेदानंतर मात्र राष्ट्रवादीला ओहोटी लागण्यास प्रारंभ झाला.  माजी खा. राजू शेट्टी यांनी खा. पवार यांना केलेला टोकाचा विरोधही या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळेच दोन्ही खासदार देणा-या या जिल्ह्यात हातकणंगलेतून सलग दोन वेळा शेट्टींनी बस्तान बसवले.  2009 साली  सदाशिवराव मंडलिक यांनी पवारांविरोधात बंड करत अपक्ष म्हणून निवडणुक लढवून जिंकली. तत्कालिन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत  मंडलिक यांना पराभूत करण्यासाठी खा. पवार यांनी जिल्ह्यांच्या कानाको्प-यात सभा घेतल्या.  

सातत्याने कोल्हापूर दौरा केला, जोडण्या लावल्या. इतकेच नव्हे तर त्यांची खास ठेवणीतली अस्त्रंही वापरली.मात्र  मंडलिकांनी ही संधी मानत प्रचारातून विरोधी उमेदवार असणा-या संभाजीराजे यांचे नाव न घेता पवारांवरच टिकेचा रोख ठेवला. याचा परिणाम कोल्हापूरकरांनी मंडलिकांना खासदार केले. एखाद्याला पाडण्याच्या उद्देशाने सातत्याने मोठा नेता कोल्हापुरात येत असेल तर कोल्हापूरकर निवडणूक हातात घेतात हा स्थायीभाव जनतेने दाखवून दिला. ‘विषय गंभीर तर कोल्हापूरकर खंबीर’, असा संदेश या निवडणुकीतून देशाच्या राजकारणात पोहचला. कारण 543 खासदार असलेल्या संसदेत देशातून फक्त दोनच अपक्ष त्यावेळी निवडून आले होते. यामध्ये  सदाशिवराव मंडलिक यांचा समावेश होता. 

यंदाच्या निवडणुकीतही कमी-अधिक हेच चित्र दिसून आले. खा. पवार यांनी सहावेळा कोल्हापूर दौरा केला. सामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वच प्रभावी नेत्यांना स्वत: फोन करुन त्यांनी निवडणुकीत उतरवले, जोडण्या लावल्या. उमेदवार महाडिक यांचीही स्वत:ची मोठी यंत्रणा यावेळी मेहनत घेत होती. या यंत्रणेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची साथ असताना आणि खा. पवार यांनी सुत्रे हातात घेतली असतानाही महाडीक यांना प्रचंड मोठया मताधिक्याने पराभव स्विकारावा लागला. या पराभवाला स्वत: महाडिक यांनी घेतलेली सोयीची भूमिका आणि सर्वच पक्षांना खिशात घालण्याच्या अविर्भावाने  महाडिक हाच पक्ष ही रुजवलेली संस्कृती कारणीभूत ठरली. 

जंग जंग पछाडले; पण...

खा. पवार यांनी जंग जंग पछाडूनही शिवसेनेचे मंडलिक एकतर्फी निवडून आले, हे मात्र पवार यांच्या ‘पॉवर’चा ‘निगेटिव्ह इफेक्ट’ झाल्यासारखे म्हणायला वाव आहे. शेट्टी यांचा पराभव अनपेक्षित मानला, तरी तो त्यांचा स्वत:चा आहे. आजपर्यंत त्यांनी राजकारणात घेतलेले निर्णय आणि भूमिका कायम त्यांच्या पथ्यावर पडलेल्या दिसतात; पण यंदा आघाडीच्या कळपात जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या पराभवातील अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण मानले जात आहे. या मतदारसंघातही पवारांची ‘पॉवर’ काहीच करू शकली नसल्याचे दिसले.