Mon, Jan 18, 2021 09:46होमपेज › Kolhapur › नगरसेविका शमा मुल्लाचे पद रद्द होणार?

नगरसेविका शमा मुल्लाचे पद रद्द होणार?

Last Updated: Nov 09 2019 12:47AM

कोल्हापूर ः पोलिस बंदोबस्तात नगरसेविका शमा मुल्ला शुक्रवारी दुपारी महापालिकेत आल्या. शेजारी डावीकडून अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, शोभा कवाळे व जयश्री चव्हाण.कोल्हापूर ः प्रतिनिधी 

 राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर व नगरसेविका सौ. शमा मुल्ला ‘मोकां’तर्गत कारवाई झाल्याने कळंबा कारागृहात आहेत. महापालिकेतील महासभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी न्यायालयाची परवानगी मागितली होती; परंतु तांत्रिक कारणामुळे त्यांना सभेला येण्यास उशीर झाला. पोलिस बंदोबस्तात आलेल्या मुल्ला यांची सभेसाठी हजेरी लागली नाही. परिणामी सलग सहा महिन्याहून जास्त काळ गैरहजर राहिल्याने त्यांचे पद धोक्यात आले असून रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने नगरसेविका मुल्ला सहा महिन्याहून जास्त कालावधी सभेला गैरहजर असल्याने विधी खात्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. सोमवारी विधी खात्याचा अहवाल येईल. त्यानंतर मुल्ला यांच्यावर कारवाई होऊन त्यांचे पद रद्द होण्याची शक्यता आहे. 

मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला यांच्यासह इतरांवर ‘मोकां’तर्गत कारवाई झाली आहे. त्यामुळे गेले पाच महिने मुल्ला महापालिकेतील महासभांना उपस्थित राहिलेल्या नाहीत. शुक्रवारच्या सभेस गैरहजर राहिल्यास त्यांचे पद रद्द होणार होते. त्यामुळे न्यायालयाकडे शुक्रवारी दुपारी बारा ते दोन या कालावधीत सभेला उपस्थित राहण्याची परवानगी त्यांनी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, आदेशातील काही तांत्रिक अडचणीमुळे आदेशात बदल करून करून घेण्यास उशीर झाला. दुपारी दोनच्या सुमारास राजारामपुरी ठाण्याचे पोलिस पथक कळंबा कारागृहात मुल्ला यांना घेण्यासाठी पोहोचले. सुमारे पावणेतीनच्या सुमारास मुल्ला महापालिकेत आल्या; परंतु तत्पूर्वी पावणेदोनच्या सुमारासच सभा संपली होती. 

सभागृह नेता दिलीप पोवार, नगरसचिव दिवाकर कारंडे, नगरसेविका अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, जयश्री चव्हाण, शोभा कवाळे, छाया पोवार आदींनी मुल्ला यांच्यासोबत चर्चा केली; परंतु सभेची वेळ संपली असल्याने त्यांना हजेरी वहीत स्वाक्षरी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. थोडा वेळ थांबल्यानंतर पुन्हा पोलिसांनी मुल्ला यांना कळंबा कारागृहात नेऊन सोडले. महापालिकेत मुल्ला यांच्या नातेवाईकांनी त्यांना बघण्यासाठी गर्दी केली होती.