Wed, Jul 08, 2020 10:53होमपेज › Kolhapur › समझोता झाला; मनोमीलनाचे काय?

समझोता झाला; मनोमीलनाचे काय?

Published On: Mar 26 2019 1:33AM | Last Updated: Mar 26 2019 12:30AM
कोल्हापूर : विकास कांबळे

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये समझोता करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या बोलावलेल्या संयुक्‍त बैठकीकडे काँग्रेसच्या एका गटाच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ आणि अन्य काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवारांविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि युवाशक्‍तीकडून सातत्याने होणार्‍या कुरघोड्या याचा पाढा वाचल्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या मनोमीलनाबाबत शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांची भूमिका त्याच पक्षातील कार्यकर्ते बजावत असतात. त्यातूनच पक्षामध्ये गटबाजीला ऊत आला आहे. जिल्ह्यातील पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान असतानादेखील ही गटबाजीची बजबजपुरी काही थांबली नाही. शेवटी जे पेरले जाते ते कधी ना कधी उगवत असते. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले आहे. यापूर्वी काँग्रेससोबत राष्ट्रवादीने केलेल्या व्यवहाराची जाणीव करून देण्याची संधी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आणि त्याचा फायदा काँग्रेसच्या नेत्यांनी उचलला.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. युती, आघाड्या जाहीर झाल्या आहेत. उमेदवारही जाहीर झाले. प्रचाराचे नारळ फुटू लागले आहेत. गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही विजयी झालेले राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच प्रथम तीव्र विरोध झाला होता. कारण, निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षाशी संबंध ठेवले नाहीत, असा त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा आरोप आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे राबणारे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनाच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाविरोधात काम करत आव्हान देण्यास सुरुवात केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत टोकाचे मतभेद असतानाही केवळ पक्षाच्या आदेशानुसार आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांचा विरोध डावलून महाडिक यांना मदत केली होती. सहा महिन्यांनंतर जेव्हा त्यांना मदत करण्याची वेळ आली तेव्हा मात्र खा. महाडिक यांनी ‘मदत केलीच नाही,’ असे म्हणत त्यांच्या उलट काम केले. त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत आ. पाटील यांना पराभूत व्हावे लागले. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणे साहजिक आहे. या सर्वाचे पडसाद आता लोकसभा निवडणुकीत उमटू लागले असल्याचे चित्र आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून खा. महाडिक यांचे नाव जाहीर झाले. प्रचाराला सुरुवात झाली; पण प्रचारापासून काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते बाजूला राहू लागले. आ. पाटील यांनी तर थेटच विरोध करण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेसचे लोक दिसत नसल्याची तक्रार पक्षातील कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. दरम्यानच्या काळात जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराबाबत आपल्याशी कोणी संपर्क साधला नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रदेशच्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घालावे, असे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी पक्षाला सांगितले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्‍त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समझोता करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ. पाटील यांना मात्र आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पाच वर्षातील कारभाराचा पाढा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही ऐकावा लागला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत सर्व निवडणुकीत खा. महाडिक यांनी त्यांच्या युवा शक्‍तीच्या माध्यमातून उलटे काम केले असल्याचे सांगितले. आघाडी धर्म पाळुन आपण चारवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला आहे. सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून लोकसभेला प्रामाणिकपणे राष्ट्रवादीला मदत केली आहे.  

विधानसभेत मात्र राष्ट्रवादी कायम आमच्या उलटीच. राष्ट्रवादीने आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच त्रास दिला आहे. महाडिक बरोबर राहतील असे वाटले होते, पण त्यांची युवाशक्‍ती आमच्या विरोधात गेली. एका गावात तर महाडिकयांनी स्वत: कबूल केले की,  तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांचा फोन आला हेाता म्हणून, आता तुमचा (म्हणजे जयंत पाटील) फोन येणार नाही ना?  असा सवाल पी. एन. पाटील यांनी जयंत पाटील केला. तरीही मी तुमचा  प्रचार करणारच. मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष सांगेल त्याच्या उलटे काम आजपर्यंत आपण कधी केले नाही आणि करणारही नाही. मात्र आता आमचे कार्यकर्ते ऐकतीलच असे नाही. कार्यकर्त्यांना मी काठी घेऊन सांगू शकत नाही. कारण मला उद्या विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. तुमचा विरोध समजूनच मला स्वत:च्या जबाबदारीवरच तयारी करावी लागणार आहे. असे त्यांनी जयंत पाटील यांना स्पष्टपणे सांगितले. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी देखील खा. महाडिक यांच्या चुका निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न या बैठकीत केला आहे. तरीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत एकदिलाने लढण्याचे ठरविले. पण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील गढूळ झालेले वातावरण एका दिवसात कसे निवळेल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.