Sat, Feb 29, 2020 17:49होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशनचा पुढाकार (video)

सीड बॉल-जागतिक पर्यावरण दिन विशेष उपक्रम (video)

Published On: Jun 06 2019 1:35AM | Last Updated: Jun 06 2019 1:35AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन, वनस्पतीशास्त्र विभाग, राजाराम कॉलेज आणि मेनन अँड मेनन लि.  यांच्या संयुक्‍त विद्यमाने बुधवारी सीड बॉलचा पर्यावरणपूरक उपक्रम घेण्यात आला. विक्रमनगर येथील मेनन अँड मेनन लि. येथे झालेल्या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचार्‍यांना सीडबॉल विषयक मार्गदर्शन करून त्याचे वाटप करण्यात आले.

प्रा. अंजली पाटील यांनी सीडबॉलविषयक तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सीडबॉल तयार करण्यासाठी स्थानिक प्रजातींच्या बीया वापरून माती व शेणखत यांचे मिश्रण करावे व त्याचा गोळा बनवावा. पहिल्या पावसाच्या सरीनंतर डोंगरमाथा, पठारावरती ते फेकावेत. यामधून नैसर्गिकरीत्या रोपाची लागण होऊन वृक्षसंपदा वाढीस लागते.  

हा पर्यावरणपूरक उपक्रम स्तृत्य असल्याचे नमूद करून मेनन अँड मेनन लि.च्या श्रेया मेनन म्हणाल्या, या उपक्रमात कंपनीचे सोळाशे कर्मचारी सहभागी होत आहेत. आगामी काळात सीडबॉल निर्मितीसाठी अधिकारी आणि कर्मचारी पुढाकार घेतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

प्रयोग सोशल फाऊंडेशचे समन्वयक विक्रम रेपे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कंपनीचे  सिनिअर जनरल मॅनेजर जयवंत खराडे, संजय बुरसे, स्वप्निल घट्टे,  मोहित पाटील, धनराज मकोटे, राजाराम कॉलेजचे  प्रा. संजय पाठारे, सुशांत बोरनाक, स्नेहल बिरांजे आदी उपस्थित होते.

सीडबॉल उपक्रमात वाढता सहभाग

शहरातील महानगरपालिकेच्या 59 शाळांमधील दहा हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालये तसेच दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, पर्यावरणप्रेमी सीडबॉल निर्मितीसाठी पुढाकार घेत आहेत. या उपक्रमासाठी राजाराम कॉलेज, शहाजी कॉलेज, दि. कन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया, निसर्गमित्र संस्था यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.