Tue, Jul 07, 2020 08:03होमपेज › Kolhapur › सावकारांच्या मालमत्तांवर येणार टाच!

सावकारांच्या मालमत्तांवर येणार टाच!

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 05 2018 11:57PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : दिलीप भिसे

गोरगरीब, अल्पभूधारक अन् श्रमजीवी घटकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत दहशतीच्या बळावर शोषण करणार्‍या कोल्हापूर परिक्षेत्रातील 296 सावकारांना सरलेल्या वर्षात पोलिसांनी मोठा झटका दिला. त्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सावकारांचा सर्वाधिक समावेश आहे. हडपलेल्या बेनामी मालमत्तांचा शोध घेऊन त्यावर टाच आणण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

कोल्हापूर, सांगलीसह पुणे, सोलापूर ग्रामीणमध्ये 2017 या वर्षात गुन्ह्यांचा आलेख काहीसा वाढला असला, तरी दहशतीच्या बळावर गोरगरिबांना लुबाडणार्‍या सावकारी टोळ्यांसह शांतता, सुव्यवस्थेला उघड आव्हान देणार्‍या गुंडांवर पोलिसांनी चाप लावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत 109 गुन्हे दाखल करून सावकारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यात आला आहे.

298 खून व 7,500 वर चोरीच्या घटना 

गतवर्षी परिक्षेत्रांतर्गत तब्बल 28 हजार 867 गुन्ह्यांची पोलिस दप्‍तरी नोंद झाली आहे. त्यात प्रामुख्याने खून 298, खुनाचा प्रयत्न 466, दरोडा 131, जबरी चोरी 773, घरफोडी 2 हजार 7, चोरी 7 हजार 624, फसवणूक, विश्‍वासघात 1 हजार 235, गर्दी-मारामारी 1 हजार 852, दुखापतीच्या 3 हजार 927 गुन्ह्यांचा समावेश आहे.

महिला अत्याचारात वाढ

निर्भया पथकाच्या माध्यमातून परिक्षेत्रात पोलिसांची प्रभावी कामगिरी असली, तरी 549 दुर्दैवी महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत. 1 हजार 651 युवतींसह महिलांना विनयभंगासारख्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, महिला अत्याचार गुन्ह्यात 1,583 म्हणजे सरासरी 96 टक्के संशयितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

38 गुन्हेगारी टोळ्यांना झटका

कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रांतर्गत 38 संघटित टोळ्यांच्या म्होरक्यासह 258 साथीदारांना ‘मोका’ कायद्यांतर्गत झटका देण्यात आला आहे. त्यात अमोल माळी, प्रशांत नागाप्पा पवार, दुर्गेश नागाप्पा पवार, मृत शाम दाभाडे, मधुकर दादासोा वाघमोडे, सचिन आप्पा ऊर्फ भाऊसाहेब इथापे ऊर्फ शिवाजी आप्पा पाटील, मयूर बाळासाहेब गोळे, लाड्या रामा भोसले, प्रमोद ऊर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर, अरुण मुकेश हस्तोडिया, महेंद्र ऊर्फ महेश गजानन तपासे, शेखर भगवान गोरे, अनिल महालिंग कस्तुरे या टोळ्यांचा समावेश आहे. 

41 ‘झोपडपट्टीदादां’च्या मुसक्या आवळल्या

सराईत गुन्हेगारी टोळ्यांच्या उच्चाटनासाठी पोलिस दलामार्फत प्रयत्न होत असताना, धोकादायक ठरणार्‍या 41 गुन्हेगारांविरुद्ध झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्याची मात्रा लागू करण्यात आली आहे. तर दारू, मटका, गर्दी, मारामारीच्या रेकॉर्डवरील परिक्षेत्रातील तब्बल 67 हजार 244 सराईतांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यात काळ्याधंद्यांशी संबंधित 29 संघटित टोळ्यांतील 155 जणांना सरलेल्या वर्षात तडीपार करण्यात आले आहे.