Sun, Oct 25, 2020 07:51होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात सतेज पाटील- महाडिक कार्यकर्ते आले आमने-सामने; घोषणाबाजीने काही काळ तणाव

कोल्हापुरात सतेज पाटील- महाडिक कार्यकर्ते आले आमने-सामने; घोषणाबाजीने काही काळ तणाव

Last Updated: Aug 14 2020 1:50PM

सतेज पाटील आणि धनंजय महाडिककोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयाच्या दारात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाने जाहीर केलेला निधी द्यावा या मागणीसाठी शुक्रवारी आंदोलन केले. दरम्यान, कावळा नाका परिसरातील धनंजय महडिक यांच्या कार्यालयाच्या दारात आंदोलनावेळी काही तणाव निर्माण झाला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

युवक काँग्रेसने मोदी सरकारने जाहीर केलेला निधी द्यावा या मागणीसाठी भाजप नेत्यांच्या दारात राज्यभर आंदोलन पुकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेला निधी द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यतील युवक काँग्रेसचे पदाधिकारी सकाळी ११ वाजता महाडिक यांच्या कार्यालयाजवळ पोहोचले.

यावेळी धनंजय महाडिक यांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचताच महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी कार्यालयाच्या बाहेर मोदी यांनी दिलेल्या निधीचा भला मोठा फलक लावला होता. रहिम सनदी, बापू जाधव, संग्राम निकम, महेश वासूदेव, रवि मुदगे, नितिन देसाई आदी कार्यकर्ते येथे उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. याकडे राज्यातील सत्ताधारी म्हणून लक्ष द्या, बेड उपलब्ध करुन द्या, अशा जोरात घोषणा दिल्या.

दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते हातात निधी मागणीचा फलक घेवून तिथे आले होते. 'कहा गये वो २० लाख करोड' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या दारातही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मागणीसाठी आंदोलन केले. युवक काँग्रेस सरचिटणीस शंभूराजे देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, बयाजी शेळके, योगेश कांबळे, संजय सरदेसाई, ओंकार सुतार, प्रताप वगरे, लखन भोगम, सचिन चौगुले, संभाजी पाटील यांना आंदोलन करत असताना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयाच्या बाहेर युवक काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलन करणार असल्याने या ठिकाणी महाडिक यांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. कार्यालयाबाहेर महाडिक समर्थकांनी केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा मोठा फलक लावला होता. महाडिक कार्यकर्त्यांना कार्यालयात आवारात थांबविण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेटस्‌ लावले होते. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी आले. त्यांनी फलक दाखवून घोषणाबाजी केली. महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनीही मोदी जिंदाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
 

 "