Tue, Jul 14, 2020 11:07होमपेज › Kolhapur › एस.टी.-आर.सी. गँग भिडले

एस.टी.-आर.सी. गँग भिडले

Last Updated: Jul 01 2020 8:04AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

एस. टी. गँग आणि आर. सी. गँगच्या गुंडांमध्ये सोमवारी रात्री उद्यमनगरात जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. तलवारी, कोयता, चाकू घेऊन एकमेकांना भिडलेल्या या भांडणात तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून बुधवारी पोलिसांनी धरपकड करत 10 जणांना ताब्यात घेतले. गणेश ऊर्फ सागर रमेश पोवार (वय 26, रा. सुभाषनगर), पंकज रमेश पोवार (27) आणि त्याचा भावसभाऊ रोहित साळोखे (दोघे रा. माऊलीचा पुतळा परिसर) अशी जखमींची नावे आहेत.

शिवाजी उद्यनगरातील एका हॉटेलसमोर दोन्ही गटांतील तरुणांमध्ये वाद झाला होता. याचे पर्यवसन रात्री उशिरा हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून घातक शस्त्रांचा वापर झाला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस याठिकाणी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर हल्लेखोर रात्री पसार झाले होते. याबाबत गणेश ऊर्फ सागर पोवारने दिलेल्या फिर्यादीवरून साईराज दीपक जाधव (वय 30), पंकज रमेश पोवार, गेंड्या ऊर्फ ऋषिकेश चौगुले (22), रोहित बजरंग साळुंखे (19), नितीन ऊर्फ बॉब दीपक गडीयल (20, सर्व रा. राजारामपुरी परिसर) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दौलतनगरातील मित्र निलेश कांबळेचे घर पेटविण्याचा प्रयत्न केल्याचेही गणेश पोवारने फिर्यादीत म्हटले आहे. 

तर दुसर्‍या गटातील जखमी पंकज पोवारने दिलेल्या फिर्यादीवरून रवी शिंदे, अमित बामणे, गणेश पोवार, निलेश बामणे, सनी साळे, निलेश कांबळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर पोलिसांनी राजारामपुरी, जवाहरनगर परिसरात संशयितांचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांच्या अटकेची प्रक्रिया सुरू होती.