होमपेज › Kolhapur › आंदोलनाचा एस.टी.ला २० कोटींचा फटका

आंदोलनाचा एस.टी.ला २० कोटींचा फटका

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 05 2018 11:49PM

बुकमार्क करा
कागल : बा. ल. वंदूरकर

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर झालेल्या आंदोलनाची एस.टी.ला मोठी झळ बसली. एस.टी. महामंडळाला तब्बल 20 कोटी रुपयांचा फटका बसला. जागोजागी एस.टी. बसेस फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी  वाहतूक ठप्प झाली. 217 बसेसची तोडफोड झाली. त्यांचे नुकसान 1 कोटी रुपये झाले, तसेच बंदच्या काळात एकूण 250 आगारांपैकी 213 आगार क्षेत्रातील बहुतांशी एस.टी. बसेसची वाहतूक ठप्प झाल्याने 19 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. त्याचबरोबर प्रवाशांचेही हाल झाले. विद्यार्थ्यांचे हाल झाले. शाळा बुडाल्या, परीक्षा रद्द झाल्या. सर्वांचीच गैरसोय झाली. आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील आता बाहेर येऊ लागला आहे.  

या आंदोलनाचे लोण आता कर्नाटकात पोहोचले आहे. निपाणी परिसरात शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळेही एस.टी.च्या फेर्‍या बंद करण्यात आल्या होत्या.   महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनामुळे सलग दोन दिवस एस.टी.च्या 217 बसेसची तोडफोड करण्यात आली.

एस.टी.चे एकूण 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता आंदोलन काळात तोडफोड झालेल्या एस.टी. बसेस दुरुस्त होऊन रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी सुरळीतपणे येण्याकरिता काही दिवस लागणार आहेत. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात महसूल बुडणार आहे. 

दरम्यान, आंदोलन कशाचेही असूदे, एस.टी. बसलाच टार्गेट करण्यात येते. तोडफोड केली जाते. त्यामुळे आंदोलन सुरू झाल्यानंतर अधिकारी आंदोलन भागात बसेस न सोडता सरळ आगारात लावणे पसंद करीत असतात.