Mon, Jul 13, 2020 07:29होमपेज › Kolhapur › उत्सुकता, चुरस अन् धाकधूक

उत्सुकता, चुरस अन् धाकधूक

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 12:30AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) होत आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक  डॉ. सुहास वारके यांनी बुधवारी सांगितले. मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिक्षेत्रात 958 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत लोकसभेच्या सर्व जागांवर अटीतटीची लढत झाल्याने निकालाची कमालीची उत्सुकता आहे. मात्र, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नैराश्यातून कायदा हातात घेऊन वातावरण गढूळ करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, उमेदवारांनी समर्थक, कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

सोशय मीडियाद्वारे अफवा पसरविणार्‍या वादग्रस्त पोस्टवर सायबर सेलचा वॉच राहील. पोस्टची दखल घेऊन ग्रुपप्रमुखाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण येथील प्रभारी अधिकार्‍यांसह पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परिक्षेत्रात पोलिस ठाण्यांतर्गत उपलब्ध फौजफाट्यासह होमगार्ड, राज्य राखीव, स्ट्रायकिंग फोर्ससह जलद कृती दल, अन्य विशेष पथके पाचारण करण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रांसह प्रमुख वर्दळीचे रस्ते, रेल्वे, बसस्थानक आवारातही 24 मेअखेर रात्रंदिवस बंदोबस्ताची खबरदारी घेण्यात आली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शहर, कागल, मुरगूड, आजरा, चंदगड, भुदरगड, तर हातकणंगले मतदारसंघातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, वाळवा तालुक्यांत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीणमधील हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, असेही डॉ. वारके यांनी सांगितले.

सायंकाळनंतर होणार चित्र स्पष्ट

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे गुरुवारी (दि. 23) सायंकाळनंतर स्पष्ट होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

बुधवारी जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची रंगीत तालीम घेतली. सायंकाळी टपाली आणि सैनिक मतदानाच्या पेट्या पोलिस बंदोबस्तात मतमोजणी केंद्रावर नेण्यात आल्या. मतमोजणीला आता अवघे काही तास उरले असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारांनीही मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली. 

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत 23 एप्रिलला अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. कोल्हापुरात 70.70 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघासाठी 70.28 टक्के मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदाम येथे, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात होणार आहे. 

कोल्हापूर मतदारसंघाची चार हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. ए हॉलमध्ये चंदगड, राधानगरी, कागल व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची, सी हॉलमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाची, डी हॉलमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची तर ई हॉलमध्ये टपाली व सैनिकी मतदानांची मोजणी प्रक्रिया होणार आहे. हातकणंगले मतदार संघाचीही चार हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. ए हॉलमध्ये शाहूवाडी, हातकणंगले विधानसभा मतदार संघाची, सी हॉलमध्ये इचलकरंजी व शिरोळ मतदार संघाची, डी हॉलमध्ये इस्लामपूर व शिराळा तर ई हॉलमध्ये टपाली व सैनिकी मतदानाची मोजणी केली जाणार आहे.

मतमोजणीला सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल, तत्पूर्वी सहा वाजता मतमोजणी कर्मचार्‍यांना मतमोजणी केंद्रांत प्रवेश दिला जाणार आहे. दोन्ही मतदार संघात विधानसभा मतदार संघ निहाय प्रत्येकी 20 टेबलवर मतमोजणी होईल. कोल्हापूर मतदार संघात सर्वाधिक 22 तर सर्वात कमी 16 फेर्‍या होतील. हातकणंगले मतदार संघात सर्वाधिक 17 आणि सर्वात कमी 14 फेर्‍या होणार आहेत. मतदान यंत्रावरील (कंट्रोल युनिट) मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेतील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. एका वेळी एकाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी होणार असल्याने मतमोजणीचा अंतिम निकाल रात्री दहा नंतर जाहीर होईल अशी शक्यता आहे.

मतमोजणीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर मतदार संघात मतमोजणीसाठी 1 हजार 160 एकूण कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हातकणंगले मतदार संघात 1 हजार 44 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या कर्मचार्‍यांच्या विधानसभा मतदार संघ आणि टेबल निहाय नियुक्त्या बुधवारी सरमिसळ (रॅन्डमायझेशन) पद्धतीने निश्‍चित करण्यात आल्या. त्यानूसार सर्व कर्मचार्‍यांची मतमोजणीची रंगीत तालीमही घेण्यात आली.

मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर अंतरावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  जिल्हा प्रशासन अथवा निवडणूक आयोगाने मतमोजणी कामकाजाशी संबधित कामाबाबत दिलेले अधिकृत ओळखपत्र असलेल्याखेरीज कोणालाही मतमोजणी केंद्रांच्या दिशेने प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी केंद्रापासून 2 कि.मी. अंतरावर पक्षनिहाय कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जागा थांबण्यासाठी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी स्क्रीन आणि लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज होणार यांचा फैसला

कोल्हापूर मतदार संघातील धनंजय महाडिक (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी), प्रा. संजय मंडलिक (शिवसेना-भाजप युती), प्रा.डी.श्रीकांत (बसपा), अरूणा माळी (वंचित बहुजन आघाडी), दयानंद कांबळे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), नागरत्न सिध्दार्थ (बहुजन मुक्ती पार्टी), किसन काटकर (बळीराजा पार्टी), बाजीराव नाईक, परेश भोसले, अरविंद माने, मुश्ताक मुल्ला, युवराज देसाई, राजेंद्र कोळी, संदीप संकपाळ, संदीप कोगले (अपक्ष) यांनी निवडणुकीत मतदारांकडे कौल  मागितला होता. यापैकी कोणाच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला हे गुरूवारी स्पष्ट होईल.  हातकणंगले मतदार संघातील राजू शेट्टी (स्वाभीमानी शेतकरी संघटना), धैर्यशील माने  (शिवसेना-भाजप युती),  अजय कुरणे (बसपा), अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी),डॉ. प्रशांत गंगावण (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), राजू शेट्टी (बहुजन महा पार्टी), मदन वजीर सरदार (बहुजन मुक्ती पार्टी), आनंदराव देसाई, विश्‍वास कांबळे, किशोर पन्हाळकर, डॉ. नितीन भट, रघुनाथ पाटील, महादेव जगदाळे, विजय चौगुले, संग्रामसिंह गायकवाड, संजय अगरवाल (अपक्ष) यांनी निवडणूक लढवली. यापैकी मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, हे गुरूवारी समजणार आहे.

मोबाईलवर समजणार फेरीनिहाय निकाल

प्रत्येक फेरीनिहाय निकाल मोबाईलद्वारे समजणार आहे. याकरिता निवडणूक आयोगाने ‘वोटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. बुधवार दि.22 पासून हे अ‍ॅप कार्यांवित होणार असून गुगल प्ले स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येणार आहे. या अ‍ॅपद्वारे सर्वात जलद, फेरीनिहाय आणि कोठेही, देशभरातील कोणत्याही मतदार संघाचा निकाल कळणार आहे. या अ‍ॅपचा वापर करावा असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.