चंदगड : प्रतिनिधी
चंदगडला नगरपंचायत दर्जा मिळावा, यासाठी जनआंदोलन कृती समितीने रविवारी चंदगड शहर बंद ठेवले होते. सर्व व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने ग्रहाकांची मोठी पंचायत झाली. रविवार सुट्टीचा दिवस असूनही ग्राहकांना खरेदी करता आली नाही. त्यामुळे जवळच असणार्या नागणवाडी साप्ताहिक बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. आरोग्य सेवाही बंद राहिल्याने रुग्णांचे हाल झाले.
नगरपंचायतीसाठी चंदगडकरांनी तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच अनेकवेळा आंदोलने केली होती. त्यानंतर आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपंचायतीचे आश्वासन दिले होते. परंतु, शासनाने आश्वासन पाळले नाही. पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने चंदगडकर संतापले आहेत.
दि. 26 रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शासनाचा निषेध करून निवडणुकीवर पुन्हा बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला होता. सर्वपक्षीय संघटनांनी कडकडीत बंद पाळून शासनाचा निषेध केला. बंदमध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.