Sat, Sep 19, 2020 07:22होमपेज › Kolhapur › खंडपीठासाठी शेंडा पार्कची जागा आरक्षित करा

खंडपीठासाठी शेंडा पार्कची जागा आरक्षित करा

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:30AMकोल्हापूर: प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन होण्याच्या द‍ृष्टीने सकारात्मक पावले पडत आहेत. या खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील 75 एकर जागा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर खंडपीठासाठी शेंडा पार्कची जागा आरक्षित करावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, याबाबत दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ.एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत दि. 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेतली.  बैठकीत खंडपीठाबाबत डॉ. जाधव, प्रा. एन. डी. पाटील यांनी आग्रही भूमिका मांडली. डॉ. जाधव यांनी खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील 75 एकर जागा द्यावी, तसेच पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत खंडपीठासाठी ठोक निधीतून 100 कोटींची तरतूद करण्यात येईल, तसेच जागेसाठी प्रक्रिया सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात येतील, असे सांगितले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेण्यात आली. 

समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, खंडपीठाचा प्रश्‍न गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. खंडपीठाचा प्रारंभिक टप्पा म्हणून सर्किट बेंच स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी नकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी गती दिली आहे. खंडपीठ हे आमचे स्वप्न आहे, ते आता साकार होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. यामुळे या खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील 75 एकर जागा उपलब्ध करून द्यावी. 

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे म्हणाले, या जागेबाबत जिल्हा न्यायालयात दावा प्रलंबित आहे. त्याची दि. 3 मार्च रोजी सुनावणी आहे. यावेळी हा दावा निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. किरण पाटील, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव यांनीही मते मांडली. शेंडा पार्क येथील जागेबाबत न्यायालयात दावा आहे. त्याबाबतचा निर्णय झाला, हा दावा निकाली निघाला, तर संबंधित जागा खंडपीठासाठी देण्याबाबतची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण भांदिगरे, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, बाबा पार्टे, अशोक भंडारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाकपचे कॉ. दिलीप पोवार, कॉ. नामदेव गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयकुमार शिंदे, निरंजन कदम, सुनील देसाई, किसन कल्याणकर, काँग्रेसचे बाजीराव खाडे, विष्णू पाटील, सरदार पाटील, स्वप्निल पार्टे, शिवसेनेचे किशोर घाडगे, मनसेचे प्रसाद जाधव, विजय करजगार, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे सुभाष जाधव, भाऊ घोंगळे आदी उपस्थित होते.