Mon, Jul 13, 2020 23:05होमपेज › Kolhapur › आत्महत्यांचे रेकॉर्डिंग सार्वजनिक सहानुभूतीसाठी

आत्महत्यांचे रेकॉर्डिंग सार्वजनिक सहानुभूतीसाठी

Last Updated: Dec 04 2019 12:29AM
कोल्हापूर : एकनाथ नाईक
माणूस सर्वात जास्त जपतो ते स्वत:च्या जीवाला... मग कोणत्या परिस्थितीत, मन:स्थितीत तो आत्महत्या करत असावा, याचे कोडे अजूनही तंतोतंत सुटलेले नाही; पण आता आत्महत्येच्या काही प्रकारांमध्ये ‘थ्रिल’ आणले जाऊ लागले आहे. आत्महत्येचे आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलेला आहे. पुण्यातील बिबवेवाडीत एका 16 वर्षांच्या मुलाने आत्महत्येचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे उघडकीला आलेले आहे.

दुसरीकडे, ठाण्यातील कळवा नाक्यावरील पुलावर एकाने अत्यंत गजबजलेले ठिकाण आत्महत्येसाठी निवडले आणि भरदिवसा पुलाच्या कठड्याला गळफासाचा दोर बांधून स्वत:ला पुलावरून झोकून दिले. अर्थात, या प्रसंगाचेही लाईव्ह रेकॉर्डिंग झालेले आहे.

कोल्हापुरात रविवारी दानिश अशफाक मकानदार या इयत्ता नववीच्या मुलाने आत्महत्या केली. आता याला नेमके कुठल्या कारणाने जगणे नकोसे झाले होते? या वयात अशी कोणती दु:खे होती? की मरण स्वस्त झाले आणि जगणे कठीण? दशकापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येची लाटच आलेली होती. बहुतांशी शैक्षणिक वाटचालीतील अपयशाच्या प्रसंगातून आलेल्या नैराश्यातून तेव्हा या घटना झाल्या होत्या. आता ‘थ्रिलर’ आत्महत्यांचे प्रकार घडू लागलेले आहेत. सुसाईड नोटऐवजी आत्महत्येपूर्वी आपला जो काही राग आहे, ज्या काही भावना आहेत, त्या रेकॉर्डिंग करून ठेवण्याचे प्रकार घडत आहेत.    

पुण्यात आत्महत्येचे रेकॉर्डिंग!
कोल्हापुरातील दानिशच्याच वयाच्या पुण्यातील बिबवेवाडीतील एका सोळा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केलेली आहे. या मुलाने मोबाईल सेट करून स्वत:च्या आत्महत्येचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलेले आहे. या मुलाला पबजी व टिक टॉक व्हिडीओचे व्यसन जडलेले होते. त्याला वडील नाहीत. आईही मुंबईला असते. तो आजीकडे होता. नववीनंतर त्याने शाळा सोडली. आजी त्याच्या पबजी खेळण्याच्या विरोधात होती. गेले 8 दिवस त्याने मोबाईलवर खेळणे बंदही केले... आणि नंतर ही घटना घडली.

ठाण्यात गजबजलेल्या ठिकाणी...
ठाण्यातील कळवा नाका येथे पुलाच्या कठड्याला दोर बांधून धनाजी भगवान कांबळे (वय 50) यांनी स्वत:ला पुलाखाली झोकून दिले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. गळफासासह ते लटकत होते... आणि पोलिसांनी त्यांना वाचवले. सुदैवाने यावेळीच रस्त्यावरून क्रेन जाताना दिसली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने धनाजी यांना वाचविले. धनाजी यांच्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली होती. तेव्हापासून ते नैराश्यात होते, असे कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. आर. बागडे यांनी सांगितले.