Mon, Nov 30, 2020 12:58होमपेज › Kolhapur › राजू शेट्टी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आखाड्यात का उतरले?

राजू शेट्टी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आखाड्यात का उतरले?

Last Updated: Nov 22 2020 9:46AM
पुढारी ऑनलाईन डेस्क

मागील वीस वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्तावर उतरून काम करत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठा पगडा आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली आहे. फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नाही तर, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी भिडणारा स्वाभिमानी पक्ष असून महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढारी ऑनलाईशी बोलताना माहिती दिली.

शिवारातील ताजा माल शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणार

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. याचबरोबर शेतकऱ्याचा माल थेट शहरातील नागरिकांना पोहोचवण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या कोल्हापूर शहरात पाण्याची समस्या मोठी आहे. यासाठी थेट पाईपलाईन योजना सुरू करण्यात आली परंतु त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील पाण्याचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा असल्याचे शेट्टी यांनी सांगीतले.

पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यावर भर

अंतर्गत राजकारणामुळे शहरातील अनेक महत्वाच्या कामांना खो लागला आहे. यामुळे शहरात रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न तसेच अनेक पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. ते सर्व प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सोयी मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार. मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नेत्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष नाही. नागरिकांना देखील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. 

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एन्ट्री

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येसाठी स्वाभिमानी निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरते. परंतु याआधी स्वाभिमानी पक्षाने कोल्हापूर महानगरपालिकेत एन्ट्री केली नव्हती. यापुढे शेतकाऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे सुद्धा आता लक्ष देणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

राजकारणासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी महापालिका वेठीस

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधक फक्त राजकारण करतात. यामुळे सामान्य नागरिकांना प्रत्येक मुद्दावरून वेठीस धरण्याचे काम सत्ताधारी आणि विरोधक करतात. मागच्या २० वर्षात स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी लढुन न्याय देण्याचे काम केले आहे, त्याचप्रमाणे शहरातील नागरीकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महापालिका निवडणुक रिंगणात उतरल्याचे राजू शेट्टी यांनी सांगीतले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे ऊस आणि दूध आंदोलनानंतर शेतकरी काही प्रमाणात सुखावला आहे, त्याप्रमाणेच आता शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी निवडणुकीमध्ये उतरणार आहे.