Thu, Sep 24, 2020 07:25होमपेज › Kolhapur › कृषी महाविद्यालयाच्या आवारात ‘बोलका फलक’

कृषी महाविद्यालयाच्या आवारात ‘बोलका फलक’

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:00AMकोल्हापूर : विजय पाटील 

पाऊस, वातावरण, आर्द्रताचे अपडेटस देणारा ‘बोलका फलक’ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे. अपडेट माहिती एकाच बोर्डवरून चोवीस तास उपलब्ध करून देणारा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात येत आहे. 

पाऊस धो-धो पडला, पण तो आकड्यात किती पडला असेल. आज वातावरणात आर्द्रता कमी आहे की जास्त आहे. सकाळपेक्षा दुपारी तापमान वाढतेय की घटतेय. या सर्वसामान्यांना पडणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे तशी सहज मिळत नाहीत, पण आता या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे कुणालाही सहज मिळू शकतात. फक्‍त यासाठी एक काम करावे लागेल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या एलईडी डिजिटल बोर्डवरील माहितीचा फोटो काढून तुम्हाला सेंड केला की झालं. कारण या या सगळ्या माहितीचा बोलका फलक आहे. 

पाऊस पडताना आपण पाहतो. थंडी वाजली किंवा उकडले तर आपण वातावरणातील बदल समजू शकतो. अगदी कालच्यापेक्षा आज तापमानात वाढ झाली तर आपण लय उकडतंय! अशी प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो, पण या सगळ्या गोष्टी खरेच वाढल्यात की कमी झाल्यात. याचे शास्त्रीय परिमान सांगणारे आकडे काय सांगतात याबाबत संबंधित अभ्यासक सोडले तर  कुणाला फारशी माहिती नसते. माहिती नसली तरी याबाबत सर्वांनाच मात्र उत्कंठा आणि उत्सुकता असते. आता ही उत्कंठा मात्र संपली असे समजायला हरकत नाही. कारण ही सगळी माहिती कृषी महाविद्यालयाने आपल्या आवारात एलईडी बोर्डवर उपलब्ध करून दिली आहे. चोवीस तास या फलकावरील अपडेटस सुरू असतात. अगदी कोल्हापूरचे अक्षांश, रेखांश, समुद्रसपाटीपासून उंची, पावसाचा तुलनात्मक डाटा हे सगळं यामध्ये आहे. 

मोबाईलवरुन नियंत्रण 

या फलकाचे नियंत्रण मोबाईलच्या माध्यमातून केले जाते. यामध्ये माहिती अपडेट करण्यासाठी मोबाईलवरुनच अपलोड केली जाते. तसेच सर्व भाषेत माहिती अपलोड केली जाते. विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळ, दुपार व सायंकाळ एक सुविचार या फलकावरुन मार्गदर्शन म्हणून प्रसिध्द केला जातो. हा डिजिटल बोर्ड वॉटरप्रुफ आहे. 

हा एलईडी फलक विद्यार्थ्यांनाच नव्हे तर प्राध्यापकांसाठी मार्गदर्शक आहे. यासह महाविद्यालयाच्या आवारात येणा-या प्रत्येकासाठी हे संदर्भ उपयुक्त ठरु शकतात. कृषी महाविद्यालय असल्याने ही सगळी माहिती शेतक-यांनाही उपयुक्त ठरेल. - प्रा. अविनाश भोसले