Fri, Jul 03, 2020 15:43होमपेज › Kolhapur › रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याला पर्यावरणाची जोड

रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्याला पर्यावरणाची जोड

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 15 2018 11:33PMकोल्हापूर : सागर यादव 

प्रजाहितदक्ष राजवट राबविणार्‍या शिवछत्रपतींनी आपल्या रयतेच्या राज्यात दूरद‍ृष्टीने अनेक योजना राबविल्या. संपूर्ण सजीव सृष्टीस अत्यावश्यक असणार्‍या अनमोल पर्यावरणाचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. पर्यावरणाचे संरक्षण, पाण्याचे नियोजन आणि कचरा व्यवस्थापनासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्याबाबतची ‘आज्ञापत्रे’ जाहीर केली. त्यांच्या या दूरद‍ृष्टीचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने यंदाच्या ‘रायगड शिवराज्याभिषेक’ सोहळ्याला पर्यावरणदिनाची जोड देण्यात आली आहे. यामुळे 6 जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होत आहे. 

शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याला 6 जून 1674 रोजी अधिष्ठान प्राप्त झाले. स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. इतिहासाला कलाटणी देणारी घटना असे या सोहळ्याचे महत्त्व आहे. महाराष्ट्राचा लोकोत्सव असणारा शिवराज्याभिषेक सोहळा आज राष्ट्रीय सण म्हणून साजरा होऊ लागला आहे. याही पुढे जाऊन जगभर विखुरलेले मराठी लोक शिवराज्याभिषेक (6 जून), शिवजयंती (19 फेब्रुवारी) हे उत्सव जगभरातील विविध देशांत मोठ्या उत्साहात साजरे करतात. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडावर साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यास कृतिशील पर्यावणपूरक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. ‘रायगड विकास प्राधिकरणां’तर्गत राज्याभिषेक दिनाच्या आदलेदिवशी म्हणजेच 5 जूनपासून रायगड स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील गडकोटांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक समिती सक्रिय झाली आहे.  

चार टप्प्यात मोहीम

मोहीम चार विभागांत विभागण्यात आली आहे. या अंतर्गत 1) प्रशिक्षित गिर्यारोहक संस्थांच्या वतीने राबविण्यात येणारी मोहीम, 2) स्वयंसेवी संस्था व शिवभक्‍तांच्या वतीने राबविण्यात येणारी स्वच्छता, 3) कचरा होऊच नये यासाठी विशेष प्रयत्न, 4) कचर्‍याचे व्यवस्थापन  अशा चार टप्प्यात मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गडाच्या डोंगर-दर्‍यात अवघड ठिकाणी साठलेला कचरा गिर्यारोहणाच्या साहित्याचा वापर करून प्रशिक्षित गिर्यारोहक काढणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात डोंगरमाथ्यावर इतरत्र पडलेला कचरा ये-जा करणार्‍यांनी गोळा करायचा आहे. तिसर्‍या टप्प्यात गडावर कचरा होऊच नये यासाठी जनजागृती करण्यात येईल. प्लास्टिक-पाण्याच्या बाटल्या वापर टाळण्यासाठी प्रबोधन होणार आहे. चौथ्या टप्प्यात स्थानिक लोकांच्या सहभागातून कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

मोहीमवीरांनी 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजता, रायगडाच्या पायथ्याशी असणार्‍या पाचाड येथील जिजाऊंच्या वाड्यात जमायचे आहे. 5 जून रोजी मोहिमेसंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार्‍यांनी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी http://bit.ly/rajyabhishek2018 या लिंकवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.