Sat, Feb 29, 2020 18:38



होमपेज › Kolhapur › महापालिकेच्या बुडाखालीच अंधार!

महापालिकेच्या बुडाखालीच अंधार!

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 11:11PM



कोल्हापूर : राजेंद्र जोशी

सार्वजनिक व्यवस्थेमध्ये सर्वाधिक कर मिळवून देणार्‍या विभागात करदात्यांना किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा दंडक आहे. तथापि, कोल्हापूर महापालिकेत तब्बल 100 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल उपलब्ध करून देणार्‍या नगररचना आणि घरफाळा विभागांमध्ये किमान सुविधांचीच वानवा आहे. 

नागरिकांना बांधकाम परवान्यावेळी कायद्याचे पुस्तक दाखविणारा तिसर्‍या मजल्यावरील नगररचना विभाग लिफ्ट आणि अग्निशामक यंत्रणेशिवाय अनेक वर्षे आपला संसार थाटून उभा आहे. तर घरफाळा विभागातील संगणकाच्या बॅटरीज् आणि अन्य देखभाल दुरुस्तीची साधी कामेही होत नसल्याने करदात्यांवर दिवसभर ताटकळत बसण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

महापालिकेच्या नगररचना विभागाचे काम राजारामपुरी येथील जनता बाझारवरील इमारतीत तिसर्‍या मजल्यावर चालते. या विभागामार्फत वर्षाला सरासरी 40 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळते. पण या कार्यालयात जाण्यासाठी इमारतीला जो जिना उपलब्ध आहे तो खडा असल्याने पन्नाशीकडे झुकलेले नागरीक आणि ज्येष्ठ नागरीक यांची हेलपाटे घालताना दमछाक होते आहे. या इमारतीला लिफ्ट बसविण्याची तरतूद करण्यात आली पण प्रत्यक्षात लिफ्ट बसविण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन त्याचा पाठपुरावा करणे प्रशासनाला काही जमले नाही.

परिणामी लिफ्टसाठी राखून ठेवलेली जागा सध्या शिपाई, मुकादम यांच्या विश्रांतीचे स्थान बनले आहे. नगररचना विभाग सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम परवाना देताना अग्निशमन यंत्रणा बसविल्याखेरीज अनुमती देत नाही. पण हा विभाग ज्या इमारतीत कार्यरत आहे तेथे मात्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही. साहजिकच महापालिकेची अवस्था बुडाखाली अंधार अशी असल्याची टीका नागरिकांतून व्यक्‍त केली जात आहे.

महापालिकेच्या घरफाळा विभागामार्फत वार्षिक 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या विभागाचे एचसीएल या कंपनीने संगणिकीकरण केले होते. संबंधित कामाचा ठेका संपल्यानंतर जुने संगणक आणि यंत्रणा महापालिकेच्या ताब्यात देऊन कंपनी निघून गेली. हे संगणक अद्ययावत करणे त्यांच्या बॅटरी बॅकअपची व्यवस्था सक्षम करणे, देखभाल दुरुस्तीचे करार करणे शिवाय या विभागाला इंटरनेटने जोडण्यासाठी मोठ्या क्षमतेची स्वतंत्र लाईन उपलब्ध करणे हे या विभागासाठी आवश्यक किमान सोपस्कार आहेत. पण दूध देणार्‍या म्हशीला कोणी चाराच घालत नाही अशी सध्या महापालिकेची अवस्था आहे. बहुतेक वेळेला या विभागातील संगणक हँग झालेले असतात. वीज गेली तर मग काय? सर्वत्र आनंदीआनंदच. बॅटरी बॅकअपही नाही आणि देखभाल दुरुस्तीचा करारही नाही. 

मिळकतधारकाची माहिती काढण्यासाठी अर्धा तास

गुरुवारी (ता. 28) दुपारी राजारामपुरी विभागात घरफाळा कार्यालयातील वीज गेली होती. नागरिक ताटकळत होते. शुक्रवार दुपारपर्यंत वीज आली नाही आणि जेव्हा वीज आली तेव्हा घरफाळा विभागातील संगणकांनी आपली मान टाकली होती. एका मिळकतधारकाची माहिती काढण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक कालावधी या विभागात लागतो. केवळ जुन्या-पुरान्या आणि मोडक्या यंत्रणेमुळे हे सर्व होत आहे. पण, याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.