पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण!

Last Updated: Aug 13 2020 3:41PM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि सूर्यकांत कडाकने यांच्या "पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स"द्वारे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची विशेष चर्चा निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या मुखचित्राचे प्रकाशन झाले होते. २० मान्यवर तज्ज्ञ, लेखक-साहित्यिकांच्या सहकार्याने डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी अल्पावधीत कथानक पूर्ण करून पुढील कार्याला गती दिली आहे. 

"पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास (महाराष्ट्र, गुजरात, राज्यस्थान, कर्नाटक, गुजरात) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात केली. 

मात्र त्यानंतर महाराष्ट्रासह भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्याने या परिस्थितीतही चित्रपटाच्या लेखन संशोधन कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी विशेष काळजी घेत व्हर्च्युवल भेटीगाठींचे आयोजन करण्यात आले. डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटाचं संपूर्ण कथानक पूर्ण झालं आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य आजच्या कठीण परिस्थितीतही अत्यंत मार्गदर्शक आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे - देशापुढे ठेवला आहे. त्यांच्या कार्याची माहिती आजच्या नव्या पिढीला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अगदी योग्य वेळी हा चित्रपट आम्ही तयार करीत असून महाराष्ट्रासह जगभरातील तरुण प्रेक्षक या चित्रपटाशी, अहिल्यादेवींच्या कार्याशी नक्की एकरूप होतील", असे मत निर्माते बाळासाहेव कर्णवर-पाटील यांनी व्यक्त केले. लवकरच अहिल्यादेवींच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.