Thu, Sep 24, 2020 10:51होमपेज › Kolhapur › परिवर्तनाचे अग्रदूत ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव

परिवर्तनाचे अग्रदूत ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव

Published On: May 20 2019 1:23AM | Last Updated: May 19 2019 9:17PM
दै. ‘पुढारी’ 82 व्या वर्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 20 व्या शतकातून 21 व्या शतकात दिमाखात अवतरलेला ‘पुढारी’ प्रादेशिकतेबरोबरच देशपातळी ओलांडून इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक क्षितिजावर तेजाने तळपू लागला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीतील ‘पुढारी’ची ही गरूडझेप डोळे दीपविणारी, अचंबित करणारी आहे. अशा या ‘पुढारी’चे आद्य संपादक ‘पुढारी’कार पद्मश्री स्व. डॉ. ग. गो. जाधव तथा आबाजींचा आज स्मृतिदिन. 
 

- डॉ. नरेंद्र जाधव

‘पुढारी’ आणि ‘पुढारी’कार यांचे वृत्तपत्रसृष्टीतील योगदान अनन्यसाधारण असे आहे. अवघ्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ‘पुढारी’कारांचे कार्य अजोड तेवढेच अतुलनीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडासारख्या आडवळणी डोंगराळ भागातील एका खेड्यात मराठा समाजात जन्मलेला एक युवक स्वतःच्या असीम कर्तबगारीने केवढे प्रचंड कार्य करू शकतो, याचा हा एक अनोखा नमुनाच होय. शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या विश्‍वामित्राप्रमाणे ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी अवघ्या मराठी मना-माणसाला अभिमान वाटावा, असे नवे विश्‍व निर्माण केले. एक शहाणा, सुजाण, द्रष्टा आणि जाणता संपादक केवढी विधायक कर्तबगारी गाजवू शकतो, त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रसंगोपात काही लिखाण झाले असले, तरी ते पुरेसे नाही. त्रोटक-टिचभर असेच त्याचे स्वरूप आहे. खरेतर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे यथोचित दर्शन घडविणारे समग्र चरित्र महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. ती काळाची आणि महाराष्ट्राची गरज आहे. 

‘पुढारी’कारांचे शिक्षणविषयक विचार आणि कार्य यांचा मागोवा घेणे एवढे मर्यादित प्रयोजन आजच्या या लेखनामागे आहे. लौकिक अर्थाने ग. गो. जाधव यांचे शिक्षण अगदीच अपुरे होते. मराठी सातवीची परीक्षा उत्तम गुणवत्तेने पूर्ण केलेल्या ग. गों.ना इंग्रजी चौथीची पुस्तके विकत घ्यायला पैसेच मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा गाडा थांबला. 

कोणत्याही महाविद्यालयाचा उंबरठा काही त्यांना पाहायला मिळाला नाही. लौकिक अर्थाने कोणत्याही विद्यापीठाची कसलीच पदवी त्यांना संपादन करता आली नाही. ग. गो.नींही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, देणे शक्यही नव्हते. असे असले, तरी मुळात वाचनाची खूप आवड असलेल्या ग. गो. जाधव यांना दासराम बुक डेपोचे दरवाजे कायमचे उघडे होते. दासराम बुक डेपोच्या पाठशाळेत बसून कुमार ग. गों. नी खूप वाचन केले. त्यातही सत्यशोधक समाजाचे वाङ्मय आवडीने वाचल्याने महात्मा फुलेंच्या विचारांचा फार मोठा प्रभाव त्यांच्या मनावर होत राहिला. 

पुढे ते ज्ञानभास्कर जाधव यांच्या सान्‍निध्यात आले. भास्कररावांच्या नजरेत हा चुणचुणीत युवक न भरला तरच नवल! आपल्याबरोबर मुंबईला येण्यासाठी भास्कररावांनी टाकलेला शब्द गणपतरावांनी, ‘जिवाच्या जाळ्यात झेलला शब्द न पडला तोच’ याप्रमाणे अलगद घेतला आणि महाराष्ट्राची सजग राजधानी महानगरी मुंबई जवळ केली. तेथेच दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे भेटले.  
गणपतराव साप्‍ताहिक ‘कैवारी’मध्ये दाखल झाले. वयाच्या अवघ्या 19-20 व्या वर्षी ग. गो. जाधवांनी पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे 20 मे 1987 ला अखेरचा श्‍वास घेईपर्यंत सुमारे पाच तपे त्यांनी पत्रकारितेला आपले जीवन सर्वस्व वाहिले. सुरुवातीची 10 वर्षे सोडली, तर 1937 पासून संपूर्ण आयुष्य ‘पुढारी’साठी वेचले. 

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महानगरात ग. गो.ना अनेक माणसे भेटली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, अच्युतराव कोल्हटकर, मामा वरेरकर, अनंत हरी गद्रे, मो. ग. रांगणेकर यांच्या सान्‍निध्यात ग. गो. चांगलेच रमले. त्यांच्यासमवेत कामगार चळवळीकडे ओढले गेले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतही आपसूकपणे ओढले गेले. त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक भक्‍कमपणे तयार झाली. वयाच्या केवळ 22 व्या वर्षी ग. गों.नी कराडे मतवाड येथे खुद्द म. गांधींची भेट घेतली. ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीमध्ये गोंधळलेल्या बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून लेखी संदेश घेतला. ‘नवा काळ’मधून हा सारा वृत्तांत प्रसृत केला. या चळवळीतील बहुतांश ब्राह्मणेतर यात सहभागी झाले. चळवळीचा जोर वाढत गेला. तरुण ग. गों.च्या हातून घडलेले हे राष्ट्रीय कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे मानले जाते. 

अशा स्थितीत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे ओढले गेले नसते तरच नवल! मुंबईतील मंदिर प्रवेश, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश, चवदार तळे, हरिजन वस्तीवर जाऊन तेथे मुक्‍काम ठोकून त्यांची सेवा करणे यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. बाबासाहेबांचा परिवर्तनाचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्या द‍ृष्टीने त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. दरम्यानच्या काळात जवळकरांबरोबर कराची काँग्रेसलाही ते जाऊन आले व जवळकरांच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरला परतले. 

वयाच्या 25 व्या वर्षी ‘सेवक’ या नावाने त्यांनी साप्‍ताहिक सुरू केले. ‘सेवक’च्या पहिल्याच अंकामध्ये भास्करराव जाधवांच्या लेखासोबत राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांचा शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेची कल्पना मांडणारा पहिला लेख प्रसिद्ध केला. पुढे 31 वर्षांनी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. 

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ व्हावे, ही राजाराम महाराजांचीही तीव्र इच्छा होती. ग. गों.नी तब्बल 31 वर्षे या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. शिवाजी विद्यापीठाला मान्यता देणारे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई यांच्याशी ग. गों.चे घनिष्ठ संबंध होते. ना. बाळासाहेब देसाई तर त्यांचे सहाध्यायीच होते. खेरीज विद्यापीठ स्थापनेच्या कामी नियुक्‍त केलेल्या समितीतील प्राचार्य सी. रा. तावडे, राजारामबापू पाटील यांच्याशीही ‘पुढारी’कारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्याशीही आपुलकीचे नाते होते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या आधीपासून ‘पुढारी’कार ग. गो. जाधव यांचे ऋणानुबंध असे जडले होते. एकूणच विद्यापीठाच्या निर्मिती-उभारणीमध्ये ‘पुढारी’कारांचे योगदान सातत्याने राहिले आहे. (पुढे विद्यमान संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यात भरच घातली.) सिनेट सदस्य, ललितकला विभागाच्या अस्थाई समितीचे अध्यक्ष, वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचे सदस्य, वृत्तपत्रविद्या विभाग अभ्यासक्रम समिती अशा विविध पदांवरून योगदान देत ‘पुढारी’कारांनी शिवाजी विद्यापीठाशी असलेले ऋणानुबंध अधिकच द‍ृढ केले आहेत. 

एकूणच ‘पुढारी’कारांचे योगदान लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने दि. 11 फेब्रुवारी 1986 रोजी ग. गो. जाधव यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला. तत्कालीन केंद्रीय मंत्री व भूतपूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते राज्यपाल कोनाप्रभाकरराव व कुलगुरू प्राचार्य के. भोगिशयन यांच्यासह श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत भव्य व शानदार समारंभात डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. 

शिक्षणाचे महत्त्व आबाजींनी नेमके ओळखले होते. ज्यांनी ज्यांनी शिक्षणाचे, ज्ञानाचे महत्त्व ओळखले, ते ते आपल्या जीवनामध्ये यशाची शिखरे गाठू शकले. आबाजी आणखी एका बाबतीत अत्यंत भाग्यवान आहेत. कारण, त्यांच्या पुढील पिढ्यांनी त्यांचे हे कार्य अविरतपणे चढत्यावाढत्या क्रमाने पुढे चालविले आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ‘पुढारी’चा केलेला गुणवत्तापूर्ण विस्तार आणि विकास अभिमानास्पद आहे. राज्य आणि देशाच्या सीमा पार करून जगाच्या पाठीवर इंटरनेटच्या माध्यमातून जगात नेऊन पोहोचविण्याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केलेले कार्य कुणाही मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल, असेच आहे. 

डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी ‘रेडिओ टोमॅटो’ची उभारणी करून प्रसिद्धी माध्यमांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हेही अभिमानास्पद आहे. शिवाजी विद्यापीठानेही स्मृती व्याखानमाला सुरू करून एक प्रकारे ‘पुढारी’कारांच्या द्रष्ट्या विचारांचा जागरच मांडला आहे. ‘पुढारी’कारांच्या विचारकार्याचा हा जागर असाच उजळत राहील, यात संदेह नाही. चंदनाप्रमाणे आयुष्यभर स्वत: झिजून सामान्य जनतेला विचारांचा सुगंध आणि त्यांच्या दु:खांवर शीतलतेची फुंकर घालणार्‍या ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव तथा आबाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!

 (शब्दांकन ः श्रीराम जोशी)